ठाण्यातील विरोधी पक्षनेत्याचा शिवसेनेत प्रवेश,राष्ट्रवादीला खिंडार

74

सामना ऑनलाईन । मुंबई

ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, त्यांचे चिरंजीव आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय भोईर व त्यांच्या पत्नी उषा भोईर यांनी मातोश्रीवर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. भोईर याच्या प्रवेशांमुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यात मोठे खिंडार पडले आहे.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मातोश्रीवर सोमवारी हे प्रवेश झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधून घेतले.  या सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे जाहिर केले. याप्रसंगी शिवसेना खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, शहरप्रमुख रमेश वैती, हेमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

देवराम भोईर हे ठाण्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते मानले जातात. महापालिकेत सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून जिंकून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवले आहे. त्यांचे चिरंजीव संजय भोईर हे देखील नगरसेवक असून विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. या दोघांसह संजय भोईर यांच्या पत्नी उषा भोईर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या