रामाचं खोट नाव घेणार्‍या संधी साधुंना कायमचा आराम द्या – विखे पाटील

79

सामना प्रतिनिधी । बुलढाणा 

रामाचे नाव घेणार्‍या संधी सांधुना आता कायमचा आराम देण्याची वेळ आली आहे. आता ते हुंकार यात्रा काढतील, गावो गावी पुन्हा फिरतील, पण आपल्या गावात आल्यावर २६ वर्षापुर्वी राम मंदिराच्या नावावर गोळा केलेला विटांचा हिशोब त्यांना मागा. राज्यात महिलांवरचे अत्याचार वाढले, बेरोजगारी वाढली, शेतमालाला भाव नाही, आणि हे राज्यभर सी.एम. चषकाच्या नावाने प्रसिध्दी मिळण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. त्यांना आता चषक देण्याऐवजी २०१९ ला नारळ देऊन घरी पाठवा असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

काँग्रेसने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या समारोप प्रसंगी चिखली येथे बोलताना विखे पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले, हे सरकार आल्यापासुन शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत आहे, मागील वर्षी धर्मा पाटील नावाच्या शेतकर्‍यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. त्यांच्या कुटूंबाला अजुनही मदत मिळाली नाही, म्हणुन त्यांच्या मुलानेही आत्महत्या करण्यासाठी टॉवरवर चढला, पण त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही. या सरकारला आता झोडपुन काढण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले की, सरकार जर राज्याचे वाटोळे करायला निघाले असेल आणि फसव्या घोषणांनी जनतेला फसवत असेल तर सक्षम विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या फसव्या घोषणांची चिरफाड करण्याचे काम आम्ही हाती घेतले. राज्यात आमचं सरकार असतांना शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सोनिया गांधींनी सरसकट कर्ज माफी केली. कोणाला रांगेत उभे राहण्याचे काम पडले नाही, २४ तासात शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली. आता मात्र वर्ष होऊनही अजुनही २० ते २२ टक्के शेतकर्‍यांनाही कर्जमाफीची रक्कम मिळाली नाही. केवळ मोठया मोठया वल्गना करून हे सत्तेवर आलेत पण सर्वसामान्यांच्या सुख दुःखांशी यांना काही देणेघेणे नाही. मागील निवडणुकीत मताचं विभाजन झाल्यामुळे राज्यात आणि केंद्रात भाजपाला त्याचा फायदा झाला मात्र यावेळी महा आघाडी करून मतविभाजन टाळण्याचा आम्ही पुर्णपणे प्रयत्न करू असेही चव्हाण यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी संविधान बदलण्याची भाषा करणार्‍या सरकारला जाब विचारण्यासाठी चिखलीत युवकांची भव्य संविधान बचाओ मोटारसायकल रॅली काढण्यात आली. हे युवक सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विराधात कधीही रस्त्यावर येऊ शकतात, असा ईशाराच या रॅलीतुन देण्यात आला.

तालुक्यातील वैरागड येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी अशोक मोरे यांच्या वारसाला अजुनही सरकारकडुन मदत मिळाली नाही, म्हणुन त्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांची पत्नी श्रीमती संगीता मोरे यांनी या सरकारच्या विराधात लढा उभा करण्यासाठी नामदार विखे पाटील साहेबांना रूम्हणे भेट देऊन या सरकारचा जोरदार समाचार घेण्याची विनंती केली. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री वसंतराव पुरके, आमदार यशोमतीताई ठाकुर, आमदार अब्दुल सत्तार, यांचीही समयोचित भाषणे झाली, त्यांनी सरकारचा खरपुस समाचार घेतला. कार्यक्रमाचे संचलन शामभाउ उमाळकर, डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी केले तर आभार प्रर्दशन लक्ष्मणराव घुमरे यांनी केले. शिवदास रिंढे, हाजी रशिदखॉ जमदार, अ‍ॅड वानखेडे, नंदु बोरे, मिनलताई आंबेकर यांनी सुध्दा सभेमध्ये आपले विचार व्यक्त केले.

यावेळी मंचावर महाराष्ट्राचे सहप्रभारी अशिष दुवा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, अब्दुल सत्तार, अभाकाँ सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार अशिष देशमुख, यशोमतीताई ठाकुर, मागासर्वीय सेलचे प्रदेश अध्यक्ष राजु वाघमारे, शामभाउ उमाळकर, संजय राठोड, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, बाबुराव पाटील, जनुभाउ बोंद्रे यांची उपस्थिती होती. खामगाव वरून निघालेल्या जनसंघर्ष यात्रेचे चिखली मतदार संघातील उंद्री, अमडापुर, पेठ, व शेलुद या गावातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

आपली प्रतिक्रिया द्या