गेली शिवशाही आली गुंडशाही, कायदा सुव्यवस्था प्रश्नावरून विरोधी पक्ष आक्रमक; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची निदर्शने

राज्यात कायदा सुव्यवस्था राम भरोसे आहे. महिला असुरक्षित आहे. ‘हिट अँड रन’च्या घटना वाढल्या आहेत मात्र या घटनांबाबत सरकार गंभीर नाही म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या अकराव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘गेली शिवशाही आली गुंडशाही’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मुंबई येथे महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले.

गेली शिवशाही आली गुंडशाही, घोषणा जास्त काम कमी महिला सुरक्षेची नाही हमी, ट्रिपल इंजिन सरकारच्या धोरणांचा नाही पत्ता राज्यातून महिला मुली होत आहेत बेपत्ता,कोणी निंदा कोणी वंदा लोकांना चिरडणे हाच आमचा धंदा महायुती सरकार, कायदा बसवला धाब्यावर महायुतीचे नेते बसले पोलिसांच्या उरावर अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत महायुती सरकारच्या काळात राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्था बाबत निदर्शन केले. शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, गुंडांना पोसणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत महाविकास आघाडी नेत्यांनी आक्रमक होत पायऱ्यांवर आंदोलन केले.