त्यांचे राष्ट्रीय नेते आहेत आणि आमच्याकडे पायताणे आहेत हे विसरू नका! बाळासाहेब थोरातांचा इशारा

विधान भवनाच्या आवारात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून गुरुवारी ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले होते. सदर घटनेत सामील असलेल्या सदस्यांवर कारवाई करा अशी आग्रही मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. यावर शनिवारी म्हणजे 25 मार्च रोजी सकाळी योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निर्णय दिला जाईल असे असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी सांगितले होते. सदनाची कारवाई सुरू झाल्यानंतरही बराचवेळ अध्यक्ष आपला निर्णय देत नसल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सदनात हा मुद्दा उपस्थित केला होता. यावर विधानसभा अध्यक्षांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मविआच्या आमदारांनी सभात्याग केला.

जोडे मारा आंदोलनाबाबत बोलत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी म्हटले होते की, सभागृहात काही सदस्यांकडून पंतप्रधानांबाबत जे वक्तव्य करण्यात आले तेही चुकीचे आहे. यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी म्हटले होते की त्यांचे वर्तन चुकीचे असेल तर त्यांच्यावरही कारवाई करा मात्र सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जो प्रकार घडला होता तो चुकीचा होता आणि त्याबाबतची कारवाई झाली पाहिजे.

सभात्याग केल्यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “विधीमंडळ परिसरात राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्यात आले. या घटनेचा तीव्र शब्दात आम्ही निषेध केला आहे. सगळ्या पक्षाचे गटनेते विधानसभा अध्यक्षांना भेटलो आणि अशी घटना कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याच्या बाबतीत पक्षाच्या अध्यक्ष किंवा वरिष्ठ नेत्यांबाबत घडू नये. तसं कोणी केलं तर त्यांना निलंबित केलं पाहिजे, अशी आम्ही भूमिका घेतली होती. याबाबतचा निर्णय आज जाहीर करण्याचे अध्यक्षांनी आश्वासन दिले होते. कालही अध्यक्षांना भेटलो होतो, त्या बैठकीला उपमुख्यमंत्रीही होते. अध्यक्षांचा कल आम्हाला असा दिसला की कामकाज संपताना याबाबत सांगायचे. मात्र याबाबतचा निर्णय सकाळीच सांगितला पाहिजे. दोन्ही बाजूची ज्यांच्या चूक झाली आहे त्यांना निलंबित केलं पाहिजे.”

काँग्रेस नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, “आंदोलन कसे असावे याचे संकेत आहे. दोन दिवसापूर्वी घडलं ते अत्यंत दुर्दैवी होती. राहुल गांधींविरोधात ज्या पद्धतीने घोषणाबाजी सुरू होती ती अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांच्याकडेही राष्ट्रीय नेते आहेत आणि आमच्याकडे पायताणे आहेत हे विसरू नका. कडक कारवाई अध्यक्षांनी करावी असा आग्रह धरला होता. अध्यक्षांचा वेळकाढूपणा सुरू आहे. त्यांनी निरपेक्ष राहून निर्णय दिले पाहिजेत. अध्यक्ष टाळाटाळ करताना दिसत असून आम्ही निषेध करत आहोत. या सगळ्या कारणांमुळे आम्ही सभात्याग केला आहे. “

तर युवासेनाप्रमुख आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेले तीन आठवडे आम्ही सदन हे संवेदनशीलपणे चालू देत आहोत. जनतेचा आवाज विधीमंडळात बुलंद झाला पाहिजे असे आमचे सगळ्यांचे मत आहे. सत्ताधारी पक्षाकडून पायऱ्यांवर बसून वेडेवाकडे प्रकार करत असल्याचे यंदा दिसून आले आहे. जो प्रकार कालपरवा झाला तो धक्कादायक होता.”