इंदापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार या शक्यतेने भाजपचे नेते आणि या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. मात्र हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये घेण्यास स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला आहे. बारामतीत त्यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन माजी नको, आजी नको, आम्हाला हवा नवीन बाजी’ अशा शब्दांत मागणी केली.
इंदापुरातील ज्येष्ठ नेते दशरथ माने, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, महारुद्र पाटील, अशोक घोगरे, तेजसिंह पाटील, अमोल भिसे, भरत शहा, छाया पडसळकर, कालिदास देवकर, सागर मिसाळ, चित्तरंजन पाटील, शांतीलाल शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी आज बारामतीमध्ये शरद पवार यांना भेटले. त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यास विरोध केला. माझी आणि आजी सोडून नवीन व्यक्तीला इंदापूरमधून पक्षातर्फे संधी द्यावी. उमेदवारी मागितल्यापैकी कुणाचीही उमेदवारी घ्या, अशी मागणी केली.
इंदापुरात बदल घडेल अशी स्थिती सध्या आहे. काही मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते ही जागा आमची आहे. मित्रपक्षांनाही जागा द्यावी लागते. आघाडी म्हटल्यावर तडजोड करावी लागते. काही जागा सोडाव्या लागतील. ज्यांच्यासाठी जागा सोडल्या त्यांच्यासाठी कामही करावे लागेल. निवडणुकीत ज्यांनी कष्ट केले त्या कार्यकर्त्यांचे ऐकावे लागेल. कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सगळ्यांना विचारून निर्णय घेतला जाईल. इंदापूरमध्ये आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल घेऊन तुम्ही कामाला लागा, असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.