शेतकऱ्यांना मदत करा, नाही तर खुर्च्या खाली करा; अवकाळीवरून सरकारला घेरले; विरोधकांचा सभात्याग

सरकारी कर्मचाऱयांच्या संपावर तोडगा काढायला सरकार तयार नाही. गारपिटीने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे; मात्र पंचनामे करायला कुणीही नाही, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत शेतकरीविरोधी सरकारचा निषेध नोंदवत सभात्याग केला. त्याआधी विधान भवनाच्या पायऱयांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन ठाण मांडत जोरदार निदर्शने केली.

राज्यात गारपिटीमुळे शेतकऱयांच्या झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला आणि सरकारवर जोरदार टीका केली. गारपिटीने आठ शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आहेत आणि सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱयांकडून सामंजस्याने काम करण्याची आवश्यकता असताना सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी 75 टक्के कर्मचारी हरामाची कमाई खातात असे वक्तव्य केले. अशा पद्धतीने सर्व कर्मचाऱयांना एका रेषेत धरणार तर कामे कशी होणार, असा सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. शेतकऱयांची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करतेय. त्यामुळे आम्ही सभात्याग करत आहोत असे अजित पवार म्हणताच महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग करून निषेध नोंदवला.

राज्यात टाईमपास सरकार! – नाना पटोले

शेतकरी संकटात असतानाही राज्य सरकार मदतीसाठी काहीच हालचाल करत नसून केवळ पोकळ घोषणा देऊन वेळ मारून नेत आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

आदेश काढल्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही

अध्यक्ष महोदय, आपण जबाबदार व्यक्ती आहात. या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, अशा संतप्त भावनाही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या. सरकारी कर्मचाऱयांना त्यांचा हक्क मागण्याचा अधिकार आहे; पण त्यांनी माणुसकीची भावना ठेवून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.