लोकशाही धोक्यात आहे; मोदी सरकारविरुद्ध विरोधी पक्षाच्या खासदारांचा दिल्लीत धडक मोर्चा

 ‘डेमॉक्रसी इज इन डेंजर’ असा भलामोठा बॅनर घेऊन विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज पेंद्रातील मोदी सरकारविरुद्ध राजधानी दिल्लीत धडक मोर्चा काढला. ‘तानाशाही नहीं चलेगी’, ‘अदानीप्रकरणी जेपीसी चौकशी व्हायलाच हवी’ अशा घोषणा देत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला. हा मोर्चा राष्ट्रपती भवनावर धडकणार होता, मात्र विजय चौकातच मोर्चा रोखण्यात आला. मोर्चात सहभागी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सत्ताधाऱयांच्या गदारोळामुळे संसद ठप्प असून अदानीप्रकरणी चौकशीस टाळाटाळ करणाऱया सरकारविरुद्ध आज विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाले. संसदेच्या आवारात निदर्शने केल्यानंतर खासदार विजय चौकात पोहचले. ‘डेमॉक्रसी इज इन डेंजर’ असे लिहिलेला भलामोठा बॅनर तसेच ‘जेपीसी ऑन अदानी स्पँडल’, सेव्ह एलआयसी असे फलक घेऊन विरोधकांनी धडक दिली. यावेळी मोदी सरकारचा निषेधाच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. मोदी-शहांच्या हुकूमशाहीविरुद्ध आम्ही लढत राहणार आहोत. अदानींच्या महाघोटाळय़ावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर द्यावेच लागेल, असे यावेळी खासदारांनी ठणकावले.

काँग्रेससह, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आम आदमी पार्टी, जनता दल (युनायटेड), भाकप आणि माकपचे खासदार या मोर्चात सहभागी झाले होते.

..तर देशात हुकूमशाही

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी मोदी सरकारवर तोफ डागली. राहुल गांधी सत्य सांगत आहेत, पण त्यांना बोलू दिले जात नाही. याचाच अर्थ लोकशाही संपवण्याचे काम देशात सध्या सुरू आहे. हे थांबले नाही तर देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही, असे खरगे म्हणाले. गेला महिनाभर आम्ही अदानीप्रकरणी चौकशीची मागणी करत आहोत, पण भाजप सरकार टाळाटाळ करत आहे. सरकार घाबरलं आहे. नक्कीच यात काळंबेरं आहे, असे नमूद करताना काहीही झाले तरी आम्ही मागे हटणार नाही, असे खरगे यांनी सांगितले.