जेटलींचा अर्थसंकल्प निव्वळ हवाहवाई, विरोधकांची टीका

2044

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशभरातील जनतेकडून याबाबत संमिश्र प्रतिक्रीया आल्या. भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पाचा उदो उदो केला असला तरी विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त हवाहवाईच अशी मजेशीर प्रतिक्रीया राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी तुरूंगातून दिली आहे.

ऐतिहासिक
केंद्र सरकारने शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा केलेला संकल्प हा ऐतिहासिक आहे. या अर्थसंकल्पाने पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्था, आरोग्य, रोजगारनिर्मिती यांना चालना मिळणार आहे. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

लोकलसेवेला बळकटी
केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, शेतीसह रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. मुंबई उपनगरीय लोकलसेकेला बळकटी देणारा हा अर्थसंकल्प असून ‘गरीबों के सन्मान मे, भारत सरकार मैदान मे’ हे सांगणारा आणि स्पष्ट करणारा आहे.- सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

स्वप्नांची मालिका
हा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस असून प्रत्यक्ष अंमलबजावणीचा कोणताही रोडमॅप नाही. मोठमोठे आकडे सांगून प्रत्यक्षात लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे.
– अशोक चव्हाण, खासदार

आत्ममग्न
वस्तुस्थितीचं भान गमावलेल्या, आत्ममग्न सत्ताधुंदांचा दिशाहीन व जनतेचा दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाने शेतकरी, नोकरदार वर्गासह सामान्य जनतेची घोर निराशा केली आहे.
– धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

शुद्ध फसकणूक
रब्बी पिकांना उत्पादन खर्च्याच्या दीडपट हमीभाव देण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा शेतकऱयांची शुद्ध फसकणूक आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ जुमलेबाजी आहे.
– राधाकृष्ण विखे- पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

सकारात्मक
विकासाला चालना देणारा आणि सकारातम्क अर्थसंकल्प आहे.या अर्थसंकल्पामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी होणार आहे.आर्थिक विकासाला चालना मिळून देशातील गुतंवणूक वाढणार आहे.
– राजनाथ सिंह,केंद्रीय गृहमंत्री

हवाहवाई
अर्थसंकल्पातून मोदी सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे, पण त्यांच्या सरकारने जनतेने दिलेले बहुमत २०१९ पर्यंतच आहे, २०२२ पर्यंत नाही. जेटलींचा अर्थसंकल्प निव्वळ हवाहवाई आहे. – लालूप्रसाद यादव, अध्यक्ष, राजद

नवे पंख
नव्या अर्थसंकल्पाने शेतकऱयांच्या पायाभूत सुविधांना, ग्रामीण क्षेत्राला आणि लघु, मध्यम उद्योगांना चालना मिळणार आहे. त्यामुळे गरीबांच्या आकांक्षांना नवे पंख लाभणार आहेत.
– अमित शहा, अध्यक्ष, भाजप

भांडवलदारधार्जिणा
केंद्र सरकारने सादर केलेला अखेरचा अर्थसंकल्पही मागील वेळेप्रमाणेच गरीबविरोधी आणि भांडवलदारधार्जिणा आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दावे दिशाभूल करणारे आहेत.
– मायावती, बसपा नेत्या

नापास
अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्पाचा परीक्षेत नापास झाले आहे.आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टाने कोणत्याही तरतूदी करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या आर्थिक वर्षात मोठय़ा प्रमाणात वित्तीय तूट वाढणार आहे.
– पी. चिंदबरम,माजी केंद्रीय अर्थमंत्री

निराशाजनक
अंत्यत निराशाजनक आणि सामान्यांचा तोंडाला पाने पुसणारा अर्थसंक्लप आहे. या अर्थसंकल्पामुळे महागाई वाढून त्यात सामान्य माणूस भरडला जाणार आहे. आरोग्य आणि कृषी या क्षेत्रांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. अर्थसंकल्प म्हणजे सरकारचा आणखी एक जुमला आहे.
– नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

नकारात्मक
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा नकारात्मक, साफ कोसळलेला आणि मोठीच फसवणूक करणारा आहे. लोकांच्या हिताचे त्यात काही नाही. बेरोजगारी आणि आजही होरपळत असलेल्या लघु, मध्यम उद्योगांवर अर्थमंत्री बोलायलाच तयार नाहीत. एक टक्का सुरू केलेला शिक्षण अधिभार तर लज्जास्पद आहे.
– ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

आपली प्रतिक्रिया द्या