विरोधकांची एकजूट भाजपला सत्तेतून बाहेर फेकेल!

विरोधकांची एकजूट होत आहे. ही एकजूटच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करेल. भाजपला सत्तेतून बाहेर फेकेल. 2024 चा निकाल आश्चर्यचकीत करणारा असेल असा ठाम विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला.  तसेच यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तीन ते चार राज्यात भाजपचा दारुण पराभव होईल. तेथे भाजप नष्ट होईल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वॉश्ंिग्टन येथे थिंक टँट आणि नॅशनल प्रेस क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणूक, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माध्यम स्वातंत्र्य, हिंदुस्थानी मीडिया यावर राहुल गांधी यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

राहुल गांधी काय म्हणाले?

हिंदुस्थानात विरोधी पक्ष एकवटले आहेत. सर्व विरोधी पक्षांशी चर्चा सुरू आहे. सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीचीदेखील आहे. कारण अनेक ठिकाणी आपली स्पर्धा विरोधी पक्षांशी आहे. निवडणुकीत कुठेतरी पाठिंबा द्यावा लागतो आणि कुठेतरी घ्यावा लागतो. मला विश्वास आहे की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट होणार आणि ही एकजूटच भाजपचा पराभव करणार.

आगामी दोन वर्षांत काँग्रेस पक्ष हिंदुस्थानात चांगली कामगिरी करेल. अंडरकरंट तयार होत आहे. 2024 चे निकाल आश्चर्यचकित करतील. तुम्ही गणित करा. विरोधकांची एकजूट भाजपला सत्तेतून बाहेर फेकेल.

येत्या काही महिन्यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. कर्नाटकप्रमाणेच काँग्रेस पक्ष येथे भाजपचा पराभव करेल. तीन ते चार राज्यात भाजप नष्ट होईल.

प्रेस फ्रिडम अर्थात माध्यम स्वातंत्र्य हे लोकशाहीसाठी फार महत्त्वाचे आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशातील लोकशाही संस्थांवर कब्जा करीत आहे. तसेच दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

पण मीडिया म्हणतो मोदींना पराभूत करणे अशक्य

हिंदुस्थानात प्रचंड बेरोजगारी आहे. महागाई खूप वाढली आहे. लोकांना खूप समस्या भेडसावत आहेत. मात्र मीडियात लिहिले आणि बोलले जाते की, निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा पराभव करणे अशक्य आहे. हे अतिशयोक्ती आहे. वास्तविक मोदी हे असुरक्षित आणि कमजोर व्यक्ती आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

60 टक्के हिंदुस्थानी मतदारांनी भाजपला मतदान केले नाही

हिंदुस्थानातील 60 टक्के मतदारांनी भाजपला, मोदींना मतदान केलेले नाही हे आधी लक्षात घ्यायला हवे. मात्र, भाजपच्या हातात आवाज करणारे वाद्य आहे. त्यामुळे ते आरडाओरडा करत असतात. परंतु हिंदुस्थानच्या बहुतांशी जनतेचा त्यांना पठिंबा नाही याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.