हिमाचलची माकडं धोकादायक! केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून कत्तलींचा निर्णय

71

सामना ऑनलाईन । मुंबई

देशातील बहुतांश ठिकाणी आढळणारी लाल तोंडाची माकडे आणि त्यांचा उच्छाद ही काही नवीन बाब नाही. हिमाचल प्रदेशमधील माकडे ही धोकादायक असल्याचा निर्णय घेत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून त्यांच्या कत्तलींचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयावरून प्राणिमित्रांमध्ये नाराजी पसरली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये माकडांची संख्या प्रचंड झाली आहे. त्यामुळे या माकडांपासून रहिवाशांच्या जीवाला आणि मालमत्तेला धोका असल्याचं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. खूप प्रमाणात संख्या झाल्याने माकडांकडून शेतांची आणि फळबागांची नासधूस होत आहे. त्यामुळे त्यांना नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, लाल तोंडाच्या माकडांना संरक्षण देण्यात आलं आहे. तरीही त्यांच्या कत्तलीचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे प्राणिमित्रांकडून प्रशासनावर आरोप करण्यात आले आहेत. वनप्रदेशाचं नियमन न करता आल्यामुळे वनविभाग आणि प्रशासनाने हे खापर माकडांवर फोडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यापूर्वी तब्बल 50 कोटी रुपये खर्च करून या माकडांची नसबंदी करण्यात आली होती. मात्र, त्या निर्णयावरही ताशेरे ओढण्यात आले होते. आताही या निर्णयामुळे त्यांच्या कृत्यांवर पांघरूण घातल्यागत झालं आहे, असाही आरोप करण्यात येत आहे.

यापूर्वीही असे प्रसंग घडले असून, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उत्तराखंडमध्ये रानडुकरांना अशाच प्रकारे धोकादायक प्राणी म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या