व्हिस्कीची बाटली मागवणे पडले महागात 

केकच्या डेकोरेशनसाठी व्हिस्कीची ऑनलाइन बाटली मागवणे तरुणीला महागात पडले आहे. ठगाने तरुणीच्या बँक खात्यातून 5 लाख 35 हजार रुपये काढले. फसवणूकप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तरुणी ही दहिसर येथे राहते. तिला केकच्या डेकोरेशसाठी व्हिस्कीची बाटली हवी होती. व्हिस्कीच्या बाटलीसाठी तिने ऑनलाइनवर वाईन शॉपचा नंबर सर्च केला. तेव्हा तरुणीला एक नंबर दिसला. त्या नंबरवर तरुणीने फोन केल्यावर ठगाने सध्या दुकान बंद झाले आहे. पण दहा मिनिटांत तुम्हाला व्हिस्कीची बाटली घरपोच करू अशा भूलथापा मारल्या. पैसे पाठवण्यासाठी ठगाने तिला एक क्यू आर कोड पाठवला. त्या कोडवरून साडेपाचशे रुपये पाठवण्यास सांगितले. ठगाने तरुणीला फोन करून व्हिस्कीच्या डिलिव्हरीसाठी घरचा पत्ता मागितला. तसेच ठगाने डिलिव्हरीसाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे भासवले. काही वेळाने पुन्हा तरुणीला दुसऱ्या ठगाचा फोन आला. ई-वॉलेट अकाऊंटवर 550 रुपये असे लिहून जेथे पैसे टाकतात तेथे पावतीचा नोंदणी क्रमांक 19051 टाकण्यास सांगितले. त्यानंतर  विविध कारणे सांगून तरुणीच्या खात्यातून 5 लाख 35 हजार रुपये काढले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली.