विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी! आषाढी सोहळ्यासाठी 10 लाख भाविक दाखल

1144

सुनील उंबरे । पंढरपूर

जाईन गे माये
तया पंढरपुरा
भेटेन माहेरा
आपुलिया …

या संत वचनाप्रमाणे सावळ्या विठूरायाच्या ओढीने महाराष्ट्रासह विविध राज्यातून 10 लाखाहून अधिक वारकरी भाविक दाखल झाल्याने, अवघी पंढरीनगरी टाळ-मृदुंग आणि ज्ञानबा-तुकोबाच्या जयघोषाने दुमदुमून गेलीय. पंढरीच्या दाही दिशांनी दिंड्या पालख्या आणि खांद्यावर वारकरी संप्रदयाची प्रतिक असलेली भगवी पताका खांद्यावर घेतलेले वारकरी पंढरीत येताना दिसत आहेत. चंद्रभागेचे वाळवंट, नगर प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, 65 एकर, मठ, धर्मशाळा आणि खुली मैदाने वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. दरम्यान आषाढी एकादशीच्या पर्वणीवर पहाटे दोन वाजता होणाऱ्या शासकीय महापुजेसाठी राज्याच्या मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे आपल्या कुटुंबासह सायंकाळी पोहचले आहेत.

संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ आदि सुमारे 100 संतांच्या पालख्या सायंकाळी विसावा पादुका येथील शेवटचा विसावा घेवून रात्री उशीरा पंढरीत दाखल झाल्या. पंढरपूर नगरवासियांच्यावतीने संतांसह आलेल्या वैष्णवांचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. तर इसबावी श्री विठ्ठल मंदिराजवळ शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उप सभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या वतीने पालखी आणि मानकऱ्यांचे स्वागत केले.

प्रत्येकाला विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली होती. दुपारी 1 वाजता श्री संत नामदेव महाराज हे पांडूरंगाचे निमंत्रण घेवून वाखरीत दाखल झाले. त्यानंतर या मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. वाखरी ते पंढरपूर हा भक्तीमार्ग टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता.

श्री संत सोपानकाकांचा पालखी सोहळा दुपारी दीड वाजता पंढरीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी साडे तीन वाजता हा सोहळा विसावा पादुका मंदिराजवळ पोहोचला. त्यानंतर सायंकाळी 3.45 वाजता निवृत्तीनाथ, सायंकाळी 4 वाजता एकनाथ महाराज, सायंकाळी 4.30 वाजता तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पोहोचला. यावेळी पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडले. सर्वात शेवटी दुपारी अडीच वाजता वाखरीहून निघालेला श्री संत ज्ञानराजांचा पालखी सोहळा वाखरीचा ओढा पार करून पुरंदरे मळ्याजवळ पोहोचला. येथे माऊलींची पालखी मुख्य रथातून उतरवून ती भाटेच्या रथात ठेवण्यात आली. हा रथ ओढण्याचा मान परंपरेप्रमाणे वडार समाजाला असल्याने या समाजातील बांधवांनी हा रथ ओढत इसबावी येथील पादुका मंदिरापर्यंत आणला. सायंकाळी 5.15 वाजता हा सोहळा इसबावी येथे पोहोचला. यावेळी हजारो भाविकांनी खारीक, बुक्याची मुक्तपणे उधळण करीत माऊलींचे दर्शन घेतले. शेकडो किलोमीटर चालून न थकता, न दमता पंढरीच्या सावळ्या विठूरायाला पाहण्यासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पंढरी समीप आल्याने ओसंडून वाहत होता.

पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण माऊली माऊली नामाच्या जयघोषात पार पडले. हे रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. आरतीनंतर श्री ज्ञानराजांच्या पादुका श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या हातात देण्यात आल्या. उजव्या हाताला वासकर तर डाव्या हाताला सोहळ्याचे मालक आरफळकर यांना घेवून शितोळे सरकार श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ झाले.

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, श्री संत एकनाथ महाराज यांच्यासह असंख्य संतांच्या पालख्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, एस.टी.बसस्थानक, अर्बन बँक, नाथ चौकमार्गे रात्री पंढरीत मुक्कामी पोहोचल्या.

दर्शनासाठी लागतात 24 तास
दर्शन रांगेत एक लाखाहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी 24 तासांचा वेळ लागत आहे तर मुखदर्शनासाठी चार ते पाच तास लागत आहेत  चंद्रभागेत स्नानासाठी पुरेसे पाणी सोडल्याने स्नानासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली. आलेल्या लाखो भाविकांना मुलभूत सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पोलीस, महसूल, नगर परिषद, मंदिर समिती आणि इतर 14 शासकीय यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील गेल्या आठ दिवसापासून पंढरपूर मध्ये तळ ठोकून नियोजन करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या