देणाऱ्याने देत जावे….

362

<< अमोल कुटे >>

अवयवदान… वैद्यकीय क्षेत्रातील एक आम बाब… पुण्याच्या अपर्णा करंदीकर यांनी दान मिळालेल्या अवयवांचे पुन्हा दान करून दानालाच एक वेगळा आयाम दिला आहे.

aparna

‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे…’ कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेतल्या या प्रसिद्ध ओळी करंदीकर नावाच्याच एका व्यक्तीने जीवनात सार्थ ठरविल्या. एकदाच नाही तर तीन अवयवांचे दान करून अपर्णा करंदीकर हिने वैद्यकीय क्षेत्रालाच एक नवा आयाम दिला आहे.

मृत्यूपूर्वी आपल्या अवयवांचे दान करण्याची अपर्णाची इच्छा पूर्ण झाली. दोन वर्षांपूर्वी अपर्णा यांची किडनी निकामी झाल्याने त्यांच्या आईने त्यांना किडनी डोनेट केली. त्यावेळी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. दोन वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले त्या दोन वर्षे सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे जीवन जगल्या, मात्र काही कारणास्तव त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. मेंदू निकामी (ब्रेन डेड) झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यानंतर अपर्णा यांच्या इच्छेनुसार १ जानेवारीला त्यांचे यकृत, डोळे आणि त्वचा हे अवयव दान करण्यात आले. त्यांच्या यकृताचे एका ६६  वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले, तर डोळे आणि त्वचा गरजवंतांसाठी देण्यात आली.

सध्या अवयवासाठी होणारी मागणी आणि पुरवठा यामध्ये खूप तफावत दिसते. त्यामुळे वैद्यकीय तज्ञांनी करंदीकर यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या यकृताचे परीक्षण करून त्याची कार्यक्षमता तपासली. ‘बायोप्सी’ केल्यानंतर यकृत प्रत्यारोपणास योग्य असल्याचे लक्षात आले. त्याचवेळी एका रुग्णाला यकृताची तातडीने गरज होती. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय सह्याद्री रुग्णालयातील प्रत्यारोपणतज्ञ डॉ. बिपिन विभुते यांच्या पथकाने घेतला.

करंदीकर यांचे मूत्रपिंडही प्रत्यारोपणयोग्य आहे का याची तपासणी करण्यात आली, मात्र ते पुनर्प्रत्यारोपणासाठी योग्य नसल्याचे लक्षात आल्याने डोळे, त्वचा आणि यकृताचे दान करण्यात आले. त्यामुळे तीन अवयवांचे दान ही वैद्यकीय क्षेत्रालाच दिशा देणारी घटना ठरली आहे.

शास्र काय सांगते?

एखाद्या रुग्णावर जेव्हा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येते व त्यानंतर त्या रुग्णाला इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज दिली जातात. या औषधांमुळे प्रत्यारोपण केलेला अवयव शरीराशी मिळतीजुळती परिस्थिती निर्माण करतो. रुग्णाला ‘इम्युनस ऑपरेशन’मध्ये रिजेक्शन होऊ नये म्हणून त्यांना आयुष्यभर ही औषधे घ्यावी लागतात. दीर्घकाळ घ्याव्या लागणाऱया या औषधांमुळे शरीराच्या इतर अवयवांवर त्याचे हळूहळू दुष्परिणाम होऊ शकतात. एखाद्या अवयवाचे प्रत्यारोपण केल्यानंतर १०० पैकी ९० रुग्ण सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगतात, पण १० टक्के रुग्णांच्या जीवाला धोका असतो. यामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान किंवा शस्त्रक्रिया झाल्यावर काही काळानंतर मृत्यू होऊ शकतो. मात्र या रुग्णाचे इतर अवयवही दान करण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

इम्युनस ऑपरेशन रिजेक्शन या प्रकारामुळे अवयव प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाची भविष्यात इतरांना अवयव दान करण्याची शक्यता धूसर होते. पण अपर्णा करंदीकर यांनी तीन अवयवयांचे दान करून वैद्यकशास्त्रात नवा अध्याय लिहिला असं म्हणायला हरकत नाही. यापूर्वी ट्रान्सप्लॅण्ट झाल्यानंतर काही तासांत किंवा दिवसांत रुग्णाचा मृत्यू झाला असेल तरच असे अवयव प्रत्यारोपण केले जात होते. त्यानंतर बरीच वर्षे असे अवयवदान हिंदुस्थानात करण्यात आले नव्हते. पोलंडमध्ये एका रुग्णाला किडनी ट्रान्सप्लॅण्ट केल्यानंतर १३ वर्षांनी त्याचे यकृत दान करण्यात आले होते.

संकल्प असाही…

व्यवसायाने पत्रकार असलेल्या अपर्णा करंदीकर या दूरदर्शन वृत्तवाहिनीमध्ये काम करत होत्या. त्यांच्यावर मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण झाले तेव्हा त्यांनी भविष्यात त्यांचेही अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे अवयवदान करण्यात आले आहे. अपर्णा यांची आई अंजली, भाऊ अमित करंदीकर यांनीही अवयवदानाचा संकल्प केला आहे.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या