अवयवदान महोत्सवात १३८ नागरिकांचा अवयवदानाचा निर्धार

प्रातिनिधिक फोटो

अंबरनाथ- येथील स्पंदन फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या अवयवदान महोत्सवाला नागरिकांना मोठय़ा संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

शहरातील स्पंदन फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या संयुक्त विद्यमाने पूर्व विभागातील वडवली परिसरात असलेल्या रोटरी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात १३८ नागरिकांनी अवयवदान करण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार त्यांच्याकडून तशा आशयाच्या कागदपत्रांची कायदेशीररीत्या पूर्तता करून घेण्यात आली.

अवयवदान चळवळीचा प्रसार करून नागरिकांत अवयवदानाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्पंदन फाऊंडेशनचे प्रमुख व सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. राहुल चौधरी यांनी दिली. या उपक्रमासाठी शहरातील विविध सामाजिक संस्थानीही सहकार्य केल्याचे ते म्हणाले.

या महोत्सवास राज्यातील पहिला हृदयरोपण झालेला अन्वर खान व अवघ्या चार वर्षांच्या मुलाचे निधन झाल्यावर त्याच्या अवयवाचे दान करणारे कर्जत तालुक्यातील जामरूंग या दुर्गम भागात राहणारे घाडगे हेही उपस्थित होते.