निराधारांनी दिला अतिवृष्टीग्रस्त कुटुंबाला जगण्याचा आधार! भीक मागून मिळालेल्या पैशातून उभा केला संसार

बीड येथील जिव्हाळा केंद्रात राहणाऱ्या जवळपास 50 अनाथांनी एका पूरग्रस्त कुटुंबाचा संसार पुन्हा उभा केला. कुणी भीक मागून पैसे दिले, कुणी धुणीभांडी करून आलेला पैसा दिला, कुणी कनवटीला बांधून ठेवलेले पैसे दिले… मुलांच्या दप्तरापासून ते घरातील भांड्यापुंड्यांपर्यंत… सगळे काही… जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे… याची प्रचिती देणारा हा प्रसंग!

गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यावर आभाळच कोसळले. दीड एकराचे मालक असलेल्या सरवदे कुटुंबाची प्रलंयकारी पुराने दाणादाण उडवली. महापुराने सरवदे यांचा संसारच वाहून नेला. घरात काहीच उरले नाही, अंगावरचे कपडे तेवढे वाचले. जीव वाचला पण संसार वाचला नाही. जगण्याच्या विवंचनेत असताना सरवदे कुटुंबाला जगण्याची उमेद मिळाली, जिव्हाळ्याच्या माणसांकडून!

सरवदे कुटुंबाची वाताहत कानावर पडल्यानंतर जिव्हाळा केंद्रातील अनाथांनी बघता बघता 20 हजार रुपये जमा झाले. अनेकांकडे भिकेत मिळालेल्या फाटक्या नोटा, चिल्लर होती. ती देखील त्यांनी दिली. फाटक्या नोटा घेऊन त्या बदल्यात काहींनी चांगल्या नोटा तर दिल्याच, पण त्यात भरही घातली. चांगले 36 हजार रुपये गोळा झाले. त्यातून सरवदे कुटुबीयांना संसारोपयोगी साहित्य देऊन मदत करण्यात आली.