ऑस्कर शर्यतीत रंगतेय सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी चुरस, ‘द फादर’ आणि ‘‘मिनारी’ यांच्यात जोरदार टक्कर

जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया ऑस्कर पुरस्कारांकडे सिनेजगताचे लक्ष लागले आहे. येत्या 25 एप्रिल रोजी (हिंदुस्थानी वेळेनुसार 26 एप्रिल रोजी) ऑस्करची घोषणा होणार आहे. यावेळी सर्वोत्कृष्ट सिनेमा कोण यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या श्रेणीत सध्या दोन सिनेमांची चर्चा रंगली आहे. ‘द फादर’ आणि ‘मिनारी’ अशी या सिनेमांची नावे आहेत. यानिमित्ताने वृद्ध पित्याचे दुःख आणि मध्यमवर्गीयांची स्वप्नं यांची टक्कर बघायला मिळत आहे.

वृद्ध पित्याचे दुःख अन् स्वप्नांचा पाठलाग

‘द फादर’ सिनेमात प्रसिद्ध अभिनेता अँथनी हॉपकिन्स आणि ओलिव्हिया कोलमॅन यांची प्रमुख भूमिका आहे. फ्लोरायन जेलर यांचा हा सिनेमा एका वयोवृद्ध व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. ही व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त आहे. आजारी वडील आणि त्यांची देखभाल करणार मुलगा यांच्यातील हळूवार नातं ‘द फादर’ मध्ये बघावयास मिळते. खूप सुंदर कथा, संवाद आणि हॉपकिन्सच्या दमदार अभिनयाच्या जोरावर हा सिनेमा ऑस्करचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. ऑस्करच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांपासून कोरियन सिनेमांचा बोलबाला दिसून येत आहे. ‘मिनारी’ सिनेमात अमेरिकेत राहणाऱया एका कोरियन कुटुंबाची कथा आहे. स्वप्न उराशी घेऊन जगणाऱया कुटुंबाला कसे सामाजिक आणि खासगी आयुष्यात अडचणींना तोंड द्यावे लागते, त्याचे दर्शन ‘मिनारी’ या सिनेमात घडते.

प्रियांकाचा ‘द व्हाइट टायगर’

ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट सिनेमा श्रेणीत यंदा आठ सिनेमांमध्ये चुरस दिसत आहे. त्यामध्ये ‘मॅक’, ‘द फादर’, ‘जुडास ऍण्ड द ब्लॅक मसीहा’, ‘मिनारी’, ‘नोमाडलँड’, ‘प्रोमिसिंग यंग वुमन’, ‘साऊंड ऑफ मेटल’ आणि ‘द ट्रायल ऑफ द शिकागो 7’ यांचा समावेश आहे. प्रियांका चोप्रा, राजकुमार राव आणि आदर्श गौरव यांच्या ‘द व्हाइट टायगर’ सिनेमाला अडेप्टेड स्क्रिनप्ले या विभागात नामांकन मिळाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या