ओशोंच्या आश्रमातील गैरकारभाराची चौकशी करा, ओशो अनुयायांची मागणी

आध्यात्मिक गुरू आचार्य रजनीश तथा ओशो यांचे निधन होऊन 21 वर्षे लोटली आहेत. या काळात त्यांच्या पुण्यातील ओशो आश्रमात संचालकांनी अनेक गैरकारभार केले आहेत. त्यांची केंद्र सरकारने चौकशी करावी अशी मागणी ओशो अनुयायांचे प्रमुख योगेश ठक्कर ऊर्फ स्वामी योगेश यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

ओशो आश्रमाची पुण्यात एकूण 20 एकर जमीन असून त्यातील 8 एकर जमीन ओशो आश्रमाच्या विद्यमान संचालकांनी विकली आहे. त्या व्यवहारास 3200 लोकांनी आक्षेप घेत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. ओशो आश्रमाचे नाव बदलून ओशो रिसॉर्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ओशो अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. याची सरकारने सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी केली असून त्याबाबतचे निवेदन यशवंतराव चव्हाण केंद्र येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दिले आहे. ओशो आश्रमातील गैरव्यवहार, राज्य आणि केंद्र सरकारला मिळू शकणारा कोटय़वधी रुपयांचा महसूल ओशो आश्रम बुडवीत असल्याचा आरोप अनुयायांनी केला. ओशो आश्रमात प्रवेशासाठी पाच हजार रुपये शुल्क घेतले जाणार असून त्या माध्यमातून जमा होणारा कोटय़वधी रुपयांचा निधी देशातील बँकांमध्ये न ठेवता परदेशातील बँक खात्यात पाठविला जात असल्याचेही स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या