मृत्यूच्या जबड्यातून…

136

डॉ. विजय ढवळे, ओटावा-कॅनडा

ही घटना घडली त्याला तीन दशके उलटून गेली. तरीही ती ब्रिटिश कोलंबिया या कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रांतामधल्या स्टोनर या छोट्याशा गावातल्या प्रत्येक रहिवाशाला व्यवस्थित आठवते. ऑक्टोबर २०, १९९३. पावसाने थैमान घातले होते. हवेत गारवा पसरला होता. सँड्रा कॅम्बेल ही ३२ वर्षीय स्त्री स्वतःची व्हॅन आपल्या घराच्या ड्रायव्हेवर पार्क करण्यात मग्न होती. कारण तिच्या सात महिन्यांच्या मुलास – बेव्हनला त्याच्या दुपारच्या विश्रांतीसाठी अंथरुणावर झोपवायचे होते. त्याचप्रमाणे सँड्राची तीन वर्षांची मुलगी केली हीसुद्धा कंटाळली होती. त्यामुळे तिला टीव्हीवर कार्टून पाहायला तिच्या खास खुर्चीत विराजमान करायचे होते. सँड्राला आणखीही दोन मुले होती. एल्डन सहा वर्षांचा तर जोरी पाच वर्षांचा. चारी मुलांना व्हॅनमध्ये बसवून, झटपट, ग्रोसरी खरेदी करून सँड्रा जेव्हा घराच्या दिशेने कूच करत होती तेव्हा तिच्या मनात आपल्या चार मुलांसाठी काय काय करायचे आहे, याचा संपूर्ण आराखडा तयार होता.

सँड्राची व्हॅन ड्रायव्हेवरच्या एका छोट्या खड्ड्यात जाऊन आदळली. ग्रोसरीच्या पिशव्या हिंदकळल्या. तिच्या दोन्ही मुलांना त्याची मजा वाटली आणि ती खिदळू लागली. सँड्राने विचार केला, प्रथम आपल्या चारी मुलांना घरात घेऊन जाऊ आणि नंतर पुन्हा बाहेर येऊन ग्रोसरीमधल्या वस्तू ज्या अस्ताव्यस्त पसरल्या आहेत त्या गोळा करायला सुरुवात करू म्हणून सँड्राने तिची दोन मुले आणि केली यांना घरात नेले. सर्वात धाकटा बेव्हन त्याच्या कार सीटमध्ये आरामात झोपला होता. सँड्राने मुलांना ओरडून सांगितले. ‘‘दंगामस्ती करू नका. ग्रोसरी घेऊन मम्मी दोन मिनिटांत परत येते आहे.’’ सँड्राचे घर प्रशस्त होते. ते हायवे ९७ आणि रेल्वेमार्गाच्या जवळ होते. सँड्राने मुलांना शिस्त लावली होती. रेल्वेच्या जवळपासही फिरकायचे नाही.

दोन मिनिटांत ग्रोसरीच्या बॅगा आणि खांद्यावर गाढ झोपेत असलेला बेव्हन अशा अवस्थेत सँड्रा घरात परतली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण एल्डन व जोरी ही दोन मुले मुसमुसून रडत होती. तिला कळेना, या मुलांना कोणत्या दुःखाचा असा उमाळा आला आहे! जेव्हा सँड्राने मी परत येते आहे असे त्या मुलांना ओरडून सांगितले होते, तेव्हा त्या सूचनेकडे त्यांनी लक्षच दिले नव्हते. त्यामुळे आपली आई हरवली अशी कल्पना करून ती भेदरलेली मुले घरात गेली. तरी सँड्राला काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. घरात कमालीची शांतता होती. तिने मुलांना विचारले, केली कुठे आहे? त्यांनी उत्तर देण्यास असमर्थता दाखवली. त्याबरोबर सँड्राच्या मनात धोक्याची घंटा वाजली. ‘केली, माझ्या बाळा, माझ्या सोनुल्या – तू कुठे आहेस…’ असे ओरडत सँड्रा घरातल्या प्रत्येक खोलीत डोकावत होती. पण केलीचा पत्ता नव्हता.

सँड्राने आपल्या दोन्ही मुलांना खडसावून विचारले, मी तुम्हाला घरात सोडले तेव्हा केलीही तुमच्या बरोबर होती. नंतर काय झाले? तेव्हा मुलांनी उत्तर दिले – आम्ही तिघे घरात जायच्या ऐवजी तुझी पाठ फिरल्याबरोबर बाहेर पळालो. आम्ही केलीला शेवटचे पाहिले तेव्हा ती आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडीच्या दिशेने धावत गेली होती. सँड्राच्या काळजाचा ठोका चुकला. या तीन वर्षांच्या अवखळ मुलीला आता कुठे शोधणार? ती आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या घरात धावत गेली. पण कुठेही केलीचा मागमूसही लागला नाही. बहुतेक घरांमध्ये कोणीही नव्हते. कारण लोक कामासाठी ऑफिसेसमध्ये गेले होते. दुपारची दोन वाजताची वेळ होती. सँड्राने ताबडतोब तिच्या नवऱ्याला फोन केला. तो प्रिन्स जॉर्ज भागात, म्हणजे घरापासून सुमारे २५ किलोमीटर्स अंतरावर काम करायचा.

त्याला सँड्रा धापा टाकत, कोंडलेल्या श्वासांतून थोडीशी उसंत घेत सांगत होती, ‘‘ब्रॉक,केली हरवली आहे. मी गेली १५ मिनिटे सर्वत्र शोधते आहे. पण तिचा पत्ता लागत नाही. तिला जोरजोरात हाका मारल्या. पण उत्तर नाही. मी ९११ या इमर्जन्सी फोनवरसुद्धा केलीच्या नाहिसे होण्याची खबर दिली आहे.’’ ब्रॉकला त्याच्या पत्नीच्या आवाजातली काळजी जाणवली. त्याने एवढेच सांगितले, ‘‘तू घरी जा आणि आपल्या बाकीच्या तीन मुलांकडे लक्ष दे. तीसुद्धा घाबरून गेली असतील. मी १५ मिनिटांत घरी पोहोचतो.’’ अर्धा तास उलटून गेला. ९११ च्या ऑपरेटरने चौकशी केली, तुमची मुलगी सापडली का? त्या प्रश्नाला सँड्राच्या हुंदक्यामुळे परस्परच उत्तर मिळाले.

दुपारचा एक वाजला होता. तेव्हा प्रिन्स जॉर्जच्या रेल्वे यार्डमध्ये इंजिन क्रमांक ४६१८ ची हालचाल सुरू झाली होती. त्याला ६१ डबे ओढून न्यायचे होते. कारण आगगाडी व्हँकुव्हर या मोठ्या शहराकडे जाणार होती. रॉन अँडरसन हा ६१ वर्षीय इंजिनीयर आणि त्याचा मदतनीस ६३ वर्षांचा मर्व्ह – या दोहोंवर आगगाडीची संपूर्ण जबाबदारी होती. या मार्गावरून दोघांनी अक्षरशः शेकडो वेळा वाटचाल केली होती. अँडरसनने शिटी फुंकली आणि आगगाडीचे अजस्त्र धूड हालचाल करू लागले, तेव्हाच फोन वाजला. गाडी थांबवा. तुमच्या मार्गावर एका बाजूला थोडी रेती उखडली गेली आहे. ती यथास्थित करायला १५ मिनिटे तरी लागतील. अँडरसनला थोडा रागच आला. आपली शिफ्ट ड्युटी आत्ताच सुरू होत आहे आणि सुरुवातीलाच काही मिनिटे रखडावे लागणार. पण काय करणार, आलिया भोगाशी असावे सादर…रॉन आणि मर्व्ह हे दोघे जवळचे मित्र बनले होते. मर्व्ह हा दोन वर्षांनी मोठा. सहा फुटांची सणसणीत उंची लाभलेला व आठ मुले पदरात असणारा सदा आनंदी माणूस. त्याची ३० वर्षे नोकरी झाली होती आणि काही महिन्यांतच तो निवृत्त होणार होता. त्याने रॉनला दोनतीन विनोद सांगून वातावरण प्रसन्न बनवले.

रॉन अँडरसन हादेखील नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारा माणूस होता. त्याच्याकडे विनोदांचा भरपूर साठा होता. म्हणून मर्व्हबरोबरचा त्याचा प्रवास नेहमी आनंददायीच होत असे. १ वाजून २५ मिनिटे झाली. अँडरसनला डिस्पॅचरने हिरवा कंदील दाखवला. तुमच्या मार्गावरचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. शुभास्ते पंथानः … रॉनच्या मनात एकच विचार होता, नेहमीपेक्षा आपण जास्त वेगाने गेलो तर अजूनही व्हँकुव्हरला वेळेवर पोहोचू शकू. मर्व्हने त्या विचाराला पुष्टी दिली. आगगाडीने वेग पकडला. नेमक्या त्याच वेळेला सँड्रा ९११ ला फोन करण्यात मग्न झाली होती. केलीचा थांगपत्ता नव्हता. आईने तिला व भावांना घराच्या उंबरठ्यावर सोडले होते आणि घरात जाण्याऐवजी ते दुसऱ्या बाजूलाच शिडांत वारा भरलेल्या जहाजाप्रमाणे तरंगत, धावत सुटले होते.

केलीने घातलेला शर्ट घराच्या कुंपणाला लावलेल्या जाळीच्या तारांत अडकला आणि ती अडखळून खाली पडली. तिने आपला शर्ट सोडवून घेतला…तोपर्यंत तिचे दोघेही भाऊ नजरेआड गेले होते. तिला समजेना – ते कुठे गेले असावेत? तीन वर्षांची ती अजाण मुलगी बावरली आणि नाकासमोर दिसणाऱ्या रस्त्यावरून धावत राहिली. तिला रेल्वे रूळ दिसले. त्यावर प्रिन्स जॉर्ज शहर येते व तिथे आपले डॅडी काम करतात… बहुतेक ममी त्यांच्याकडेच गेली असेल, असा विचार तिच्या चिमुकल्या मनात आला व ती रेल्वे ट्रकवरून सैरभैर अवस्थेत धावत सुटली…

दुपारचे सवादोन वाजले होते. रॉन आणि मर्व्हनी आपल्या हातातल्या कॉफीचा ग्लास खाली ठेवला. डिस्पॅचरचा आवाज घुमत होता – ‘‘इंजीन ४६१८, एक ३ वर्षांची चिमुरडी हरवली आहे. कृपा करून सतर्क राहा. ती दिसते का याकडे लक्ष ठेवा.’’ ते दोघे एकदम उत्तेजित झाले. या मार्गातले प्रत्येक झाड, प्रत्येक शेत त्यांना ठाऊक होते. कुठल्या घरात छोटी मुले आहेत हेदेखील लक्षात होते. रॉन म्हणाला, मला वाटते इथून आठ किलोमीटरवर रेड रॉक भागातलीच ही छोटी असावी. रॉनने त्वरित डिस्पॅचरला सांगितले, आम्ही ट्रेनचा स्पीड कमी करतो आहोत. २० किलोमीटर्स तासाला. दोन मिनिटातच रेड रॉक भाग येऊन गेला. रॉनचा पाय बेकवर होता. न जाणो, एकदम थांबायला लागले तर तयारी असावी. मर्व्हच्या मनात त्याची नातवंडे येत होती. केलीचे भ्रमण चालूच होते. रेल्वे टॅकवरची खडी आता तिला बोचू लागली होती. ती धावायची थांबली होती. दमल्यामुळे हळूहळू पावले टाकत, पण चालतच होती…

इंजीन ४६१८. दोघेही कर्मचारी जागृत होते. चौकस नजरेने परिसर न्याहाळत होते आणि टॅकवर लांबून एक बोचके पडल्याचे दोघांनी एकाच वेळी पाहिले. तीच ती हरवलेली मुलगी असली पाहिजे. दोघांच्या मनात एकच विचार आला. इमर्जन्सी ब्रेक्स करकचून दाबले. ते गाठोडे त्यांच्या इंजिनपासून अवघ्या ६० मीटर्सवर होते. ब्रेक लावले तरी गाडी अजून पुढे १०० मीटर्स तरी जाणार होती. मर्व्हने धाडशी निर्णय घेतला. त्याने चालत्या ट्रेनमधून उडी मारली…वाऱ्याच्या वेगाने धावत तो केलीजवळ पोहोचला. तिला एका हाताने उचलून बाजूच्या गवतावर फेकून दिले आणि स्वतःही उडी घेतली. एका क्षणाचा जरी उशीर झाला असता तरी दोघांचा रेल्वेखाली खात्मा झाला असता! मर्व्हला केली दिसली तेव्हा तिचा चेहरा कमालीचा भेदरलेला होता. मर्व्हच्या कानात ट्रेनचा कानठळ्या बसवणारा आवाज घुमत नव्हता. त्याच्यासमोर फक्त एकच लक्ष्य होते, ती छोटीशी मुलगी. तिला मर्व्हने उचलले. ती त्याच्या हातातून खाली पडली. ट्रेनजवळ आली होती. मरण व जगणे यामध्ये फक्त दोन क्षणांचा झिरझिरीत पडदा होता.

केलीचे हातपाय थंड पडले होते. डोक्यावर लहानशी जखम झाली होती. तेथून चेहऱ्यावर वाहणारे अश्रूही आता सुकले होते. ती जिवंत आहे की नाही याचीच मर्व्हला शंका यायला लागली. अचानक केलीने डोळे उघडले. ती पुटपुटली – माझी ममी कुठे आहे? मर्व्हला हुंदका फुटला. केली जिवंत होती. तिला इंजिनमध्ये बसवले. डिस्पॅचरला सांगितले, हरवलेली मुलगी सापडली. ही घटना घडल्यानंतर नऊ दिवसांनी प्रिन्स जॉर्जमध्ये एका छोटेखानी हॉलमध्ये एक समारंभ झाला. ३०० लोकांच्या उपस्थितीत मर्व्ह आणि रॉनचा शहराच्या पालिकेतर्फे सत्कार झाला. मर्व्हने भाषणात एवढेच म्हटले, ‘‘मित्रांनो, चमत्कार घडतात. त्या दिवशी केलीच्या भोवती देवदूत होते. म्हणून मृत्युरूपी सैतान तिला स्पर्श करू शकला नाही. मी फक्त निमित्तमात्र झालो.’’

(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या