पाकिस्तानातील हिंदूचा आक्रोश

75

पाकिस्तानातील सिंध प्रांतात अल्पसंख्यांकांना संरक्षण देणारं विधेयक विधानसभेने मंजूर केल्यानंतर आता त्याला स्थगिती दिल्याने ते पुनर्विचाराच्या फेऱ्यात अडकले आहे. पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेची भूमिका ही अल्पसंख्यांकाबाबत नेहमीच अन्यायकारक ठरली आहे. या पार्श्वभूमीवर तेथील विदारक वातावरणाचा वेध घेतला आहे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी.

सर्वोच्च नियामक मंडळाच्या समितीने पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांसाठीच्या बहुप्रतीक्षित हिंदू विवाह कायद्याला अंतिम मंजुरी दिली आहे. आता पाकिस्तानात हिंदू विवाह कायदा लागू होणार आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात नॅशनल असेंब्लीने पाकिस्तानात राहणाऱया हिंदू नागरिकांसाठी हिंदू मॅरेज बिल 2006 पारीत केले होते. मागील 66 वर्षांपासून पाकिस्तानात राहणाऱया हिंदू नागरिकांच्या विवाहाची नोंदणी होत नव्हती. त्यामुळे तेथील हिंदू अस्वस्थ होते.

पाकिस्तानमध्ये सध्या १.६ टक्के हिंदू राहतात. तरीदेखील त्यांच्या विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता मिळालेली नव्हती. ख्रिश्चन विवाहासाठी इंग्रजांनी तयार केलेला १८७० चा कायदा अस्तित्वात आहे. त्यानुसार त्यांच्या विवाहांना कायदेशीर मंजुरी होती, परंतु पाकिस्तानच्या निर्मितीपासून हिंदू विवाह कायदा अस्तित्वात नसल्यामुळे हिंदूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या जाचातून पाकिस्तानमधील हिंदूंची सुटका होणार आहे. त्याशिवाय घटस्फोट आणि जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यास मदत मिळणार आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा मंजूर झाल्याने पाकिस्तानात राहणाऱया हिंदू नागरिकांना दुसरा विवाह करण्यास परवानगी मिळाली आहे. पण त्यामुळे पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंची परिस्थिती सुधारेल का? त्यांच्यावरील अत्याचार थांबतील का? गेल्या ७० वर्षांत त्यांची परिस्थिती कशी होती याचे प्रथम अवलोकन करावे लागेल. त्यावरूनच पुढची वाटचाल कशी असेल याचा अंदाज आपल्याला लावता येईल.

हिंदूंना मतस्वातंत्र्य नाही

पाकिस्तानात हिंदूंच्या मताला किंमत नाही व त्यांना मतस्वातंत्र्य नाही. त्याची सुरुवात जनरल झिया उल हक यांच्या कारकीर्दीत १९७० च्या दरम्यान झाली. त्यांनी वेगळे मतदारसंघ काढून हिंदूंना दुय्यम नागरिक बनवले. त्यामुळे तेथील हिंदूंना मार खाण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या देशात मुसलमान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, लोकसभेचा सभापती, क्रिकेट टीमचा कप्तान, सिनेमाचा हीरो होतो. राज्यात व केंद्रातील मंत्रीपदे मुसलमानांच्या चरणी अर्पण करून आपले निधर्मीपण सिद्ध करून दाखविण्याची जणू चढाओढच राजकीय पक्षांत लागलेली असते. त्यांनी पाकिस्तानात रोज मरणाऱ्या हिंदूंचा आक्रोश जरा ऐकावा म्हणजे बरे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  दै.’सामना’च्या अग्रलेखातून २८ जुलै २०१६ रोजी केली होती.

हिंदुस्थानातील एखाद्या भागात मुसलमानांना नुसते खरचटले तरी पाकिस्तानचे राज्यकर्ते थयथयाट करतात व त्यांना आझम खानसारखे येथील पुढारी साथ देतात. हिंदुस्थानातील अल्पसंख्याक समुदायाचे म्हणजे मुसलमानांचे जीवन असुरक्षित असल्याचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सांगितले जाते, पण गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर निर्घृण हल्ले सुरू आहेत व हे हल्ले वाढतच जात आहेत.

हिंदूंनी एकतर `इस्लाम’ कबूल करावा नाहीतर मरणाला सामोरे जावे अशी भयंकर स्थिती तिथे निर्माण झाली असली तरी याबाबत पाक राज्यकर्त्यांना जाब कोण विचारणार हा प्रश्नच आहे. हिंदुस्थानातील मुसलमानांचे जितके राजकीय, आर्थिक व धार्मिक लाड केले जातात त्याच्या एक टक्का लाडही पाकिस्तानातील मुसलमानांचे पाकिस्तानात होत नसतील. येथे हिंदुस्थानातही मुसलमानांना साथ व हिंदूंना लाथ हेच धोरण सेक्युलरवादाच्या नावाखाली राबवले जात असते.

पाकिस्तानातील हिंदूंची अवस्था

फाळणीनंतर अनेक वर्षांनीसुद्धा पाकिस्तानातील हिंदूंची कत्तल केली गेली किंवा त्यांची धर्मांतरेही घडवून आणली गेली. परिणामी पाकिस्तानातील त्यांची संख्या जी १९५०मध्ये आठ ते  नऊ टक्के होती, ती आज १.६ टक्के किंवा दहा लाखांहून कमी झालेली आहे. पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) फाळणीनंतर १९५० मध्ये २४ टक्के हिंदू होते.२०११ च्या जनगणनेनुसार बांगलादेशात आज केवळ ८.६ टक्के हिंदूच तिथे शिल्लक उरले आहेत. त्यांची संख्या आता एक कोटी आहे. कश्मीर खोऱयात कुणीच हिंदू/शीख शिल्लक राहिलेला नाही. त्याउलट सुरुवातीस (१९५० मध्ये) तीन कोटी असलेली हिंदुस्थानातील मुस्लिमांची संख्या आता १३ ते १५ कोटींपर्यंत फुगली आहे. तरीही कुणा धर्मनिरपेक्षतावादी, समाजवादी आणि मानवतावादी नेत्याने किंवा लेखकाने किंवा मीडियाने हिंदूंवरील अत्याचारांबाबत ‘ब्र’ही काढलेला नाही. संयुक्त राष्ट्रसंघाचेही पाकिस्तान/बांगलादेशातील हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येकडे दुर्लक्ष आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर या देशात हिंदूंची लोकसंख्या हळूहळू शून्याच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही.

बांगलादेशचे शास्त्रज्ञ दीपेन भट्टाचार्य  `स्टॅटिस्टिकल फ्युचर ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या आपल्या लेखात सांगतात की, “२०२० पर्यंत पाकिस्तान/ बांगलादेश मिळून केवळ १.५ टक्के हिंदू उरतील. बांगलादेशातील राजकीय अभ्यासक प्रोफेसर अली रियाझ यांनी त्यांच्या `गॉड विलिंग: द पॉलिटिक्स ऑफ इस्लामिझम’ या पुस्तकात असा निष्कर्ष काढला की, ‘`गेल्या २५ वर्षांत बांगलादेशातून ५३ लाख हिंदूंनी पलायन केलेले आहे.”

१९७० मध्ये पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांत मुजिबूर रेहमानच्या आवामी लीगचा विजय झाला. त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये आणि पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) फुटून निघू नये म्हणून याह्याखानने तीस लाखांवर नागरिकांची कत्तल केली (८५ टक्के हिंदू) आणि एक कोटी निर्वासित हिंदुस्थानात आले. त्याचा इतिहास गॅरी बास यांच्या पुस्तकात दिला  आहे. अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक, पत्रकार गॅरी बास यांच्या २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या `द ब्लड टेलिग्राम : निक्सन, किसिंजर ऍण्ड ए फॉरगॉटन जेनोसाईड’ या पुस्तकाने जगात खळबळ उडवून दिली. एका विदेशी लेखकाने बांगलादेश निर्मितीच्या वेळी हिंदूंवर झालेले भयानक अत्याचार जगापुढे मांडले आहेत. तरी त्यावर त्यावेळेच्या हिंदुस्थान सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. हिंदुस्थानातील वर्तमानपत्रे,  संघटना आणि मानवाधिकारवादी नेत्यांनीही या मुद्यावर  तिखट आणि प्रभावी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती, पण असे काही घडले नाही. १९७१ साली हिंदूंच्या नरसंहाराची बाब उजेडात आली असतानाही हिंदुस्थानने या नरसंहाराचे वर्णन ‘बांगलादेशातील नागरिकांवर झालेले ते अत्याचार आहेत’ अशा शब्दांत केली आणि ‘हिंदू’ शब्दाचा उल्लेख  टाळला.

हिंदूंचे बलुचिस्तानमधून पलायन

बलुचिस्तान प्रांतात गेल्या वर्षात अनेक हिंदूंचे अपहरण करण्यात आले असून यामुळे भयभीत झालेल्या अल्पसंख्याक हिंदू धर्मीयांनी पाकिस्तानच्या इतर भागांत पलायन केले. एकटय़ा क्वेटा विभागात तीन महिन्यांत तब्बल 70 जणांचे अपहरण करण्यात आले होते. ७० पैकी ५३ जणांची सुटका करण्यात यश मिळाले. असे असले तरी उर्वरित जणांचा अजूनही काहीही थांगपत्ता नाही. दक्षिण सिंध प्रांतातील पूरग्रस्तांसाठी जमात-उद-दवा या संघटनेतर्फे उघडण्यात आलेल्या शिबिरामध्ये मुस्लिमांसह शेकडो हिंदू पूरग्रस्तही आश्रयासाठी आले होते. जेवणाबरोबरच ते आपल्याला इस्लामची शिकवणही देतात आणि नमाज पढण्यासाठी आग्रह धरतात अशी तक्रार आलेल्या  हिंदू नागरिकांनी केली होती. पाकिस्तानात अल्पसंख्याक, विशेषत: हिंदू मुलींचे अपहरण, सक्तीने धर्मांतर आणि सक्तीने विवाह करण्याचे प्रकार वाढत असून पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल यांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

हिंदूंबरोबर सौख्याने नांदू इच्छिणारे मवाळ मुस्लिम आजही पाकिस्तानात आहेत. मात्र त्यांच्यावर कट्टरपंथीयांचा दबाव मोठय़ा प्रमाणावर आहे. धार्मिक शत्रूंना ठारच मारले पाहिजे अशी धारणा असलेल्या आक्रमक वहाबी गटांच्या निशाण्यावर सहिष्णू मुस्लिमही येत असल्याने तेथील परिस्थिती बिघडत चालली आहे.  गेल्या काही महिन्यांत वहाबींनी पंजाब आणि  सिंधमध्ये  धुमाकूळ घातला आहे.

सात वर्षांनंतरच हिंदुस्थानी नागरिकत्व 

हिंदुस्थान भेटीवर आलेल्या पाकिस्तानातील १४० हिंदूंनी मायदेशातील धर्मांध दहशतवादाचा धसका घेतला. त्यांनी घरी न परतण्याचाच निश्चय केला. दिल्लीतील रस्त्यांवरच ते वास्तव्य करून आहेत. हिंदुस्थानात जर कोटय़वधी बांगलादेशी, लाखो नेपाळी, हजारो तिबेटी राहू शकतात तर आम्ही पाकिस्तानी हिंदू का राहू शकत नाहीत? असा सवाल केला. सरकारने आमची सोय करावी अशी विनंतीही त्यांनी केली. दररोज कुणीतरी येऊन आम्हाला मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी धमकावते. अशा देशात आम्ही शांतपणे कसे जगू शकतो? पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तानात हिंदूंची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या रक्षणाची नैतिक जबाबदारी आपली आहे. त्यासाठी केंद्र शासनावर जनतेने दबाव टाकणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या