ही ‘क्रुझ’ नाही तर कोरोनाचा चीन बाहेरील केंद्र बिंदू, 454 प्रवाशांना आजाराची लागण

893
corona-japan-cruise

चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून चीनला आतापर्यंत बसलेला हा सगळ्यात मोठा फटका मानला जात आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 50 हजारांच्या पुढे गेली असतानाच मृतांचा आकडा देखील 1700 च्या घरात पोहोचला आहे. चीनमधील वुहान प्रांतात कोरोनाचा केंद्रबिंदू मानला जातो. मात्र या वुहान शहराबाहेर देखील कोरोनाचा प्रसार झाला असून याला रोखण्यासाठी चीन आणि अन्य देशातील सरकार, संस्था मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. चीन बाहेर एक प्रवासी क्रुझ देखील कोरोनाच्या जाळ्यात अडकली असून या क्रुझवरील तब्बल 454 प्रवाशांना रोगाची लागण झाली आहे. चीनच्या बाहेर एकाच ठिकाणी इतक्या मोठ्याप्रमाणावर कोरोनाची लागण झालेले एकमेव ठिकाण आहे.

जपानच्या बंदरावर उभ्या असलेल्या ‘डायमंड प्रिन्सेस’ क्रुझवर असलेल्या प्रवाशांमध्येही कोरोना व्हायरसचा संसर्ग होत असल्याचे सातत्याने समोर आहे. सोमवारी करण्यात आलेल्या तपासणीत आणखी 99 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या क्रुझवरील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 454 इतकी झाली आहे.

या आधी रविवारी घेण्यात आलेल्या तपासणीत क्रुझवरील आणखी 137 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले होते. त्यात दोन हिंदुस्थानी नागरिकांचाही समावेश आहे. सोमवारपासून या क्रुझवरील प्रवासी व कर्मचाऱ्यांची अंतिम वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग न झालेल्या हिंदुस्थानी नागरिकांना क्रुझवरून बाहेर काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे टोकियोमधील हिंदुस्थानी दूतावासाने स्पष्ट केले होते.

क्रुझवर शनिवारी आणि रविवारी झालेल्या वैद्यकीय चाचणीत कोरोनाचा संसर्ग झालेले 137 नवे रुग्ण आढळले. त्यांना उपचारासाठी योकोहामा बंदराजवळ उभारण्यात आलेल्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. याआधी तिथे तीन हिंदुस्थानींना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या