मायेच्या कुशीत विषाणूची घुसखोरी! देशभरात 1 लाख 19 हजार मुलांचे आईवडील हिरावले

कोरोना महामारीमुळे गेल्या 14 महिन्यांत अनाथ झालेल्या मुलांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जगभरातील 21 देशांमध्ये कोरोना विषाणूने 15 लाखांहून अधिक मुलांचे आईवडील किंवा त्यांचे पालनपोषण करणाऱ्या पालकांना हिरावले आहे. एकटय़ा हिंदुस्थानात 1 लाख 19 हजारांहून अधिक मुले कोरोनामुळे अनाथ झाली आहेत. 25,500 मुलांनी मातृछत्र तर 90,751 मुलांनी पितृछत्र गमावले आहे. तसेच 12 मुलांवर आईवडील दोन्ही गमावण्याची वेळ आली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. याचदरम्यान नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑन ड्रग्ज एब्युज (एनआयडीए) आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट्स ऑफ हेल्थच्या (एनआयएच) सर्वेक्षणातून महामारीत अनाथ झालेल्या मुलांची धक्कादायक आकडेवारी उघडकीस आली आहे. या सर्वेक्षणानुसार, जगभरात 11 लाख 34 हजार मुलांनी आपले आईवडील किंवा आजीआजोबा गमावले. यातील 10 लाख 42 हजार मुलांवर आईवडील असे दोन्ही पालक गमावण्याची दुर्दैवी वेळ ओढवली. 2898 हिंदुस्थानी मुलांनी त्यांचा आईवडिलांच्या मृत्यूनंतर सांभाळ करणाऱ्या आजीआजोबांपैकी एकाला गमावले, तर 9 मुलांना कोरोना संसर्गामुळे आजीआजोबा दोघांचाही आधार गमवावा लागला. हिंदुस्थानात प्रत्येक 1 हजार मुलांमागे आईवडील, आजीआजोबा किंवा सांभाळ करणारे इतर जवळचे पालक गमावणाऱ्या मुलांचे प्रमाण 0.5 टक्के इतके आहे.

n कोरोना विषाणूने अनाथ केलेल्या मुलांची सर्वात अधिक संख्या असलेल्या देशांमध्ये हिंदुस्थानसह दक्षिण अफ्रिका, पेरू, संयुक्त राज्य अमेरिका, ब्राजील आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे. दक्षिण अफ्रिका वगळता इतर देशांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

अनाथ मुलांचा सांभाळ; काळजी कोण घेणार?

अनाथ मुलांच्या पालनपोषणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. काही देशांनी यादृष्टीने धोरण आखण्यासाठी पावले उचलली आहेत. या अनाथ लहान मुलांचा मायेने सांभाळ कोण करणार, आईवडिलांप्रमाणे काळजी कोण घेणार, असा प्रश्न अनेक मुलांच्या बाबतीत उपस्थित होत आहे. तसेच ही मुले आईवडिलांच्या पश्चात कुठल्या गैरमार्गाला लागू नयेत, यासंबंधीही पावले उचलली पाहिजेत, असे ‘एनआयडीए’चे संचालक नोरा डी. व्होल्कोव यांनी नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या