
देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)विरोधात तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई सुरू आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास तब्बल 7 राज्यांमध्ये पोलिसांनी छापे टाकले. आतापर्यंत सुमारे 170 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. याआधी NIA आणि ED ने 13 राज्यांत छापे टाकत 100 हून अधिक पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दहशतवाद्यांना निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात हे छापे टाकण्यात आले होते.
वृत्तसंकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम, कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात धाडी टाकण्यात आल्या आहेत. PFI संदर्भात सोमवारी रात्री उशिरापासून शाहीन बाग आणि जामियासह दिल्लीतील अनेक भागांमध्ये छापेमारी सुरू आहे. या छाप्यांमध्ये सुमारे 30 जणांना अटक करण्यात आली आहे.
पीएफआयच्या विरोधात झालेल्या कारवाईविरोधात हिंसक निदर्शनांच्या नियोजनासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजेपर्यंत 7 राज्यांत 200 ठिकाणांवर छापे टाकून 170 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
RSS, भाजप, तसेच अनेक हिंदुत्त्ववादी नेते आणि संघटनांना लक्ष्य बनविण्याचा पीएफआयचा प्लॅन होता, अशी माहिती याआधीच समोर आली आहे. पीएफआयच्या वरिष्ठ नेत्यांना नवी दिल्लीतील तिहार जेलमध्ये ठेवल्यामुळे पीएफआय कार्यकर्ते नाराज असल्याचीही माहिती मिळते आहे.