गेल्या दोन वर्षांत जगभरातील टेक कंपन्यांनी 1 लाख 24 हजार 517 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. 2023 पासून सुरू झालेली कर्मचारी कपात अद्याप सुरू आहे. जुलैच्या अखेरपर्यंत जगातील 384 टेक कंपन्यांनी जवळपास सवा लाख कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. जुलै 2024 मध्ये इंटेलने 18 हजारांहून अधिक कर्मचारी कपात केली आहे. कर्मचारी कपात करून कंपनीला 10 अब्ज डॉलरची बचत करायची आहे. मायक्रोसॉफ्टने दोन महिन्यांत 1 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. यूकेजी सॉफ्टवेअर कंपनीने 2200 कर्मचाऱ्यांना कामांवरून काढले. कॅलिपहर्नियातील सॉफ्टवेअर कंपनी इंटुइटने 1800 कर्मचाऱ्यांना काढले. ब्रिटिश कंपनी डायसननेसुद्धा 1 हजार लोकांना नारळ दिला. जगभरात सुरू असलेल्या कर्मचारी कपातीचा परिणाम हिंदुस्थानातसुद्धा पाहायला मिळत आहे. बंगळुरूमधील स्टार्टअप रेशामंडी कंपनीने 80 टक्के कर्मचाऱ्यांना कामांवरून काढले आहे. एडटेक कंपनीने 250, वेकूलने 200, पॉकेट एफएमने 200, बंजीने 220 आणि हंबल गेम्स कंपनीने सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे.
‘डेल’चा 12,500 कर्मचाऱ्यांना नारळ
जगभरात नावाजलेली कॉम्प्युटर कंपनी ‘डेल’ ने आपल्या 12500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. ‘डेल कंपनीने सेल्स डिव्हिजनमध्ये पुनर्रचनेची घोषणा केली. यापुढे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एआयवर लक्ष केंद्रीत करण्याची रणनीती ‘डेल’ कंपनीची आहे. याचाच भाग म्हणून कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘डेल’ कंपनीच्या व्यवस्थापनाने 6 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांसाठी इंटर्नल मेमो काढून नव्या बदलांची माहिती दिली. त्यामध्ये सेल्स टीमला सेंट्रलाईज करणे आणि नवे एआय केंद्रीत सेल्स युनिट बनवण्याच्या योजनेबद्दल माहिती देण्यात आली.
50 हजार कर्मचाऱ्यांना सक्तीची दहा दिवसांची सुट्टी
अमेरिकेतील मंदीचा परिणाम हिंदुस्थानात दिसू लागलाय. गुजरातच्या सुरत येथील एका प्रमुख डायमंड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने आपल्या 50 हजार कर्मचाऱ्यांना 17 ते 27 ऑगस्टदरम्यान दहा दिवसांची सुट्टी जाहीर केली. किरण जेम्स असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीचे अध्यक्ष वल्लभभाई लाखानी म्हणाले, मागणीअभावी आमच्या उद्योगावर परिणाम झालाय. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय. या दहा दिवसांत 50 हजार कर्मचारी काम करणार नाहीत. त्यांना या काळात पगार दिला जाईल. मात्र काही रक्कम कापून घेतली जाईल.