LOOK BACK 2018 : जुन्यांना धक्का नव्यांना दायक

सामना प्रतिनिधी । मुंबई

बॉलीवूडसाठी 2018 म्हणजे फूल ऑफ सरप्रायझेस ठरले. सलमान, आमीर, शाहरुखसारख्या बडय़ा स्टार्संनी गमावले, तर आयुष्यमान खुराना, राजकुमार राव, विकी कौशल या नव्या दमाच्या अभिनेत्यांनी कमावले. महत्त्वाचे म्हणजे हे वर्ष सिनेसृष्टीसाठी दिशादर्शक ठरले आहे. सिनेमात अभिनेता कोण आहे, यापेक्षा सिनेमाचा विषय काय आहे, हे पाहून प्रेक्षकांची पावले थिएटरकडे वळली. राजी, स्त्री, बधाई हो, अंधाधून, तुंबाड या चित्रपटांनी हे दाखवून दिले. अभिनेत्यांच्या नावावर सिनेमा विकण्याचा प्रयत्न प्रेक्षकांनी हाणून पाडला.

बायोपिक, सिक्वेल, रिमेकचा फॉर्म्युला हिट!
बायोपिक, सिक्वेल आणि रिमेकचा बॉलीवूड फॉर्म्युला यंदादेखील हिट ठरला. ‘हिचकी’, ‘बागी 2’ आणि ‘धडक’ हे सिनेमे गाजलेल्या सिनेमांचे रिमेक होते. ‘हेट स्टोरी- 4’, ‘रेस-3’, ‘साहेब बिबी और गँगस्टर’, हॅपी फिर भाग जायेगी, ‘नमस्ते इंग्लंड’ आणि ‘2.0’ हे सिक्वेल होते. ‘रोबोट’चा सिक्वेल असलेल्या रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ‘2.0’ या साय-फाय सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता होती. या सिनेमाचे बजेट 500 कोटींहून अधिक होते. प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाने 300 कोटींची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळाला. बायोपिकच्या बाबतीत बोलायचे तर ‘पॅडमॅन’, ‘सूरमा’, ‘संजू’, ‘मंटो’ हे बायोपिक यावर्षी रिलीज झाले. त्यापैकी ‘सूरमा’ आणि ‘मंटो’ या हे बायोपिक फारशी कमाल दाखवू शकले नाही. ‘संजू’ने मात्र 300 कोटींहून अधिक कमाई केली.

बजेट छोटा, धमाका मोठा
गतवर्षीप्रमाणे यंदाही छोटय़ा बजेटच्या सिनेमांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यात सर्वात आधी नाव घ्यावे लागेल ते आयुष्मान खुराणाच्या ‘बधाई हो’ या सिनेमाचे. अवघ्या 22 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने जगभरात 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आयुष्मान खुराणासाठी हे वर्ष खऱया अर्थाने लकी ठरले आहे. त्याच्या ‘अंधाधून’ या सिनेमालाही चाहत्यांची पसंती मिळाली. एकंदरीत सिनेमाची योग्य निवड करण्यात त्याला यश आले, असेच म्हणावे लागेल. राजकुमार राव, श्रद्धा कपूरच्या 20 कोटींचे बजेट असलेल्या ‘स्त्री’ सिनेमाने 129 कोटी कमावले. संजय दत्तच्या जीवनप्रकासाकर आधारित 80 कोटी बजेटच्या ‘संजू’नेही 345 कोटींची घसघशीत कमाई केली. ‘राजी’, ‘बागी 2’, ‘हिचकी’, ‘वीरे दी केडिंग’, ‘सत्यमेव जयते’, ‘परमाणू’, ‘सुई धागा’ या सिनेमांनीदेखील बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली.

100 कोटींचे मानकरी
‘पद्मावत’, ‘सोनू की टिटू की स्वीटी’, ‘रेड’, ‘बागी 2’, ‘राझी’, ‘रेस 3, ‘संजू’, ‘गोल्ड’, ‘स्त्री’, ‘बधाई हो’, ‘2.0’, ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ हे शंभर कोटी क्लबमध्ये एन्ट्री करणारे सिनेमे ठरले आहेत.

बडे हीरो ठरले झीरो
बॉलीवूडमध्ये केवळ स्टारडमवर सिनेमे चालतात असा वर्षानुवर्षांचा समज आहे. हा समज यंदा मोडीत निघाला. शाहरुख खानचा ‘झीरो’, आमीर खानचा ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’, सलमान खानचा ‘रेस 3’ या सिनेमांनी प्रेक्षकांचा पुरता अपेक्षाभंग केला. केवळ कलाकारांच्या नावावर या सिनेमांनी 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री मिळवली खरी, पण प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांनादेखील त्यांना सामोरे जावे लागले. अगदी सोशल मीडियावरदेखील प्रेक्षकांनी या सिनेमांची खिल्ली उडवली. एकंदरीत खानावळींसाठी हे वर्ष फारसे चांगले गेले नाही.

हॉलीवूडने दिली तगडी टक्कर
यावर्षीही हॉलीवूडचे तगडे आव्हान बॉलीवूडपुढे निर्माण झाले आहे. ‘ऍक्वामॅन’, ‘द नन’, ‘वेनम’, ‘फॉलआऊट’ या हॉलीवूड सिनेमांच्या ओपनिंग कलेक्शनपुढे बॉलीवूड सिनेमांनी गुडघे टेकल्याचे दिसले. ‘ऍक्वामॅन’ हा सिनेमा इंग्रजीव्यतिरिक्त हिंदी, तमीळ, तेलुगू भाषांमध्ये रिलीज झाला होता. अवघ्या सहा दिवसांत या सिनेमाने 40 कोटींचा गल्ला जमवला. ‘वेनम’ने 4.8 कोटींची तर ‘द नन’ या सिनेमाने 8 कोटींची तगडी ओपनिंग मिळवली.

आंतरपाट गाजले
यंदाच्या वर्षाची खासियत म्हणजे बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींचे विवाहबंधनात अडकणे. दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, नेहा धुपिया आदींनी पडदे गाजवले नाहीत, पण त्यांचे आंतरपाट गाजले. या अभिनेत्रींच्या लग्नसोहळ्यांची चर्चा महिनोंमहिने झाली.

दिवाळीनंतर झाला मराठी सिनेमांचा धमाका
गतवर्षीप्रमाणे याही वर्षी तब्बल 125 च्या आसपास मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. कथानकापासून ते निर्मितीपर्यंत वेगवेगळे प्रयोग मराठीत पाहायला मिळाले. मात्र एकाचवेळी दोनपेक्षा अधिक सिनेमांचे प्रदर्शन क्लॅश, थिएटर कमी मिळणे, प्रसिद्धीत कमी पडणे अशा विविध कारणांमुळे मोजकेच सिनेमे प्रेक्षकांवर छाप पाडण्यात यशस्वी झाले आहेत. दिवाळीनंतर मराठी सिनेमांनी मोठा धमाका केल्याचे पाहायला मिळाले. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सुबोध भावेच्या अभिनयाने सजललेल्या ‘…आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा एकदम कडक प्रतिसाद मिळाला. सुबोधच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. शिवाय या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला. स्वप्नील आणि मुक्ता या गाजलेल्या जोडीचा ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या सिनेमाची इतकी उत्सुकता होती की, अवघ्या तीन दिवसांत या सिनेमाने 5 कोटींचा गल्ला जमवला. नागराज मंजुळे यांनीदेखील ‘नाळ’ या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. आई आणि मुलाच्या भावस्पर्शी नात्यावर असलेल्या या सिनेमाने अवघ्या 12 दिवसांत 18.5 कोटींची घसघशीत कमाई केली. ‘लय भारी’चा सिक्वेल असलेल्या ‘माऊली’ आणि प्रवीण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमानेही आपल्यासह प्रेक्षकांचा पैसा वसूल केला. महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिक यश मिळवणारे हे सिनेमे दिवाळीनंतर प्रदर्शित झाले आहेत. बबन सिनेमाने 8.5 कोटींची तर बॉईज 2 ने 16 कोटींची कमाई केली आहे. यावर्षी रिलीज झालेल्या ‘फर्जंद’, ‘गुलाबजाम’, ‘न्यूड’ या दर्जेदार सिनेमांनीही प्रेक्षकांना सिनेमागृहांत यायला भाग पाडले. मराठी सिनेमात माधुरीला पाहण्याची प्रेक्षकांची ‘बकेट लिस्ट’देखील यावर्षी पूर्ण झाली. परंतु हा सिनेमा फारशी गर्दी खेचू शकला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या