वंचितसोबतचा तलाक ‘एमआयएम’च्या ओवेसींना कबूल

1816

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फूट पडली आहे. जागा वाटपात प्रकाश आंबेडकरांकडून सन्मान राखला जात नसल्याचा आरोप करत खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित आघाडीला ‘तलाक’ देत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही आंबेडकर दोन्ही पक्षांची युती कायम असल्याचे सांगत होते. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी जलील यांनी घेतलेला निर्णय हीच पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे सांगत वंचितसोबतचा तलाक कबूल केला आहे.

लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीने भल्याभल्यांना घाम फोडला होता. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम काय कमाल करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, जागवाटपावरून दोन्ही पक्षांचे फाटले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याच्या प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या निर्णयावर असुद्दीन ओवेसी यांनी अखेर शिक्कामोर्तब केले आहे.

वंचितने देऊ केल्या होत्या 8 जागा

‘एमआयएम’ने वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर यांच्याकडे 95 जागांची मागणी केली होती. त्यानंतर आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसी यांना ईमेल पाठवून 8 जागा देऊ केल्या होत्या. त्यांनी देऊ केलेली 8 जागांची ऑफर ‘एमआयएम’ला मान्य नसल्याने वंचित आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

एमआयएमची 74 जागांवर लढण्याची तयारी

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीत आमची आता कोणासोबत युती नाही. त्यामुळे किती जागांवर उमेदवार लढवायचे याचे बंधन ‘एमआयएम’वर नाही. मात्र, सध्या एमआयएम 74 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती खासदार जलील यांनी दिली.  दलित समाज किंवा अन्य कोणत्या समाजावर एका पक्षाचे वर्चस्व आहे हे कोणी समजू नये. एमआयएम सोबतही दलित मराठा आणि ओबीसी समाज असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या