गायीचा शाळकरी मुलीवर हल्ला; डोक्याला पडले पाच टाके, मालकाला अटक

chennai-cow-hits-girl

चेन्नईतील एका शाळकरी मुलीवर घरी जात असताना गायीनं हल्ला केल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या मुलीच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत. त्यानंतर जनावराच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या भीषण हल्ल्यात जखमी झालेल्या आयशावर उपचार सुरू आहेत.

आयशा बुधवारी शाळेतून घरी परतत असताना रस्त्यात तिच्या पुढे असलेली एक गाय अचानक वळली आणि तिच्या शिंगांनी तिने आयशाला जखमी केलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गाय वारंवार मुलीवर हल्ला करताना दिसत आहे. तिला शिंगांनी उचलून जमिनीवर फेकताना दिसत आहे.

मुलगी आणि तिच्या आईचा आरडाओरडा ऐकून लोक घरातून मदतीसाठी धावले. काही लोकांनी दगडफेक करत आणि आरडाओरड करत गायीला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण ती गाय मुलीला मारत राहिले.

एका स्थानिकानं काठी हातात घेत पाठलाग केला तेव्हा गाय पळाली. मुलीची उभी राहण्यासाठी धडपड सुरू असताना दिसली.

चौथीच्या विद्यार्थिनीला रुग्णालयात नेण्यात आलं. या व्हिडीओनंतर तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमण्यन यांनी जखमी मुलीची भेट घेतली.

गायीच्या मालकाविरुद्ध निष्काळजीपणा आणि सार्वजनिक जीवन धोक्यात आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अरुम्बक्कम पोलीस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्यानं एनडीटीव्हीला सांगितलं.

‘आम्ही तपास करत आहोत. सध्या हे जामीनपात्र प्रकरण आहे’, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

व्हिडीओत किमान चार गुरं दिसत आहेत.

चेन्नई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि मालकाला ₹ 2,000 दंड ठोठावला.