पोलिसांना मालकी तत्त्वावरील घरे द्या!

33

सामना ऑनलाईन, मुंबई

पोलीस वसाहतीला जीर्ण इमारतींची दुरुस्ती, पुनर्बांधणीच्या समस्या दूर करा. पोलीस वसाहती ज्या ठिकाणी आहेत त्याच जागी पुनर्वसित करून पोलिसांना मालकी तत्त्वावर घरे मिळण्यासाठी पाठपुरावा करा, अशी मागणी शिवसेनेने राज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन केली आहे.

मुंबईतील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाकरिता शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर हे सतत पाठपुरावा करीत आहेत. हा मुद्दा कुडाळकर यांनी प्रत्येक अधिवेशनात उपस्थित केला आहे व सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी पोलीस बांधवांसह आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन पोलीस वसाहतींतील जीर्ण इमारतींच्या दुरुस्ती/पुनर्बांधणीबाबतच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

यात प्रामुख्याने त्यांनी पोलीस वसाहती ज्या ठिकाणी आहेत त्याच जागेवर पुनर्विकसित करून त्यांची गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यास परवानगी मिळावी, जेणेकरून पोलीस बांधवांना मालकी तत्त्वावर घरे मिळतील व शासनास नवीन निवासस्थानेही उपलब्ध होतील. शिवाय या शासकीय इमारतींचा पुनर्विकास हा पोलीस कर्मचाऱयांच्या निधीमधून अथवा म्हाडाच्या प्रचलित शासन दराने बांधकाम शुल्क आकारून करून त्यांना नवीन घरे उपलब्ध केल्यास याचा शासनास फायदाच होईल या मागण्या मांडल्या. यावर दीपक केसरकर यांनी सकारात्मक भूमिका दर्शवीत अधिकाऱयांसोबत चर्चा करून लवकरच अहवालासह सदर प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर सादर करून पोलीस बांधवांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या