नि:शब्द शब्दकोश! या वर्षी शब्दही कोरोनाच्या दहशतीत, ‘वर्ड ऑफ द इयर’ निवडू शकली नाही ऑक्सफर्ड डिक्शनरी

कोरोनाच्या संकटाने या वर्षी ऑक्सफर्ड डिक्शनरीला  नि:शब्द केले आहे. यंदाच्या अस्थिर वातावरणात ऑक्सफर्ड डिक्शनरीला वर्ड ऑफ द इयर निवडता आलेला नाही. त्याऐवजी डिक्शनरीने शब्दांची यादी जाहीर केली आहे. कोरोनामुळे शब्दही दहशतीत असून भाषेच्या दृष्टीने असे वेगळे वर्ष कधीच बघितले नाही, असे ऑक्सफर्ड प्रकाशनाचे म्हणणे आहे.

ऑक्सफर्ड लॅग्वेजेस दरवर्षी असा एक इंग्रजी शब्द निवडते, ज्याचा जगभरात मोठय़ा प्रमाणात वापर झालाय. त्याला वर्ड ऑफ द इयर म्हटले जाते. हा शब्द ऑक्सफर्डच्या 1100 कोटी शब्दसंग्रहातून निवडला जातो. यंदा मात्र 2020 साली कोणताही एक शब्द निवडण्यास कंपनीने नकार दिला आहे. याविषयी ऑक्सफर्ड लँग्वेजेसचे अध्यक्ष कास्पर ग्रॅथव्होल म्हणाले, महामारीने इंग्रजी भाषेवर खूप जलद व व्यापक प्रभाव टाकला आहे. दरवर्षी आमची टीम शेकडो नवे शब्द आणि त्यांच्या वापराची माहिती घेते. मात्र, 2020 ने आम्हाला निःशब्द केले आहे. यात एवढे शब्द आले की निवड करणे कठीण जात आहे. आतापर्यंत सेल्फी, वॅप, अनफ्रेंड, टॉक्झिक अशे शब्द निवडले गेले आहेत. गेल्या वर्षी क्लायमेट इमर्जन्सी हा शब्द होता.

पॅन्डेमिकचा वापर 57 हजार टक्क्यांनी वाढला
ऑक्सफर्ड लॅग्वेजेस कंपनीच्या अधिकारी कॅथरी कॉन्नॉर मार्टीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी महामारी (पॅन्डेमिक) शब्दाचा वापर 57 हजार टक्क्यांनी वाढला. कोरोना व्हायरस हा शब्द 1968 मध्ये वापरला गेला होता. वैद्यकीय संदर्भासाठी खूप कमी वेळा वापरला होता. मात्र यंदा त्याचा वापर वाढला. एप्रिलमध्ये टाईम हा शब्द सर्वात जास्त वापरला होता. त्यालाही मागे टाकून कोरोना हा शब्द पुढे गेला आहे. जानेवारीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाच्या वृत्तानंतर इम्पीचमेंट हा शब्द टॉपवर होता. मे महिन्यात ब्लॅक लाईव्हज मॅटर या शब्दाचा वापर वाढला.

शब्दांवर कोरोनाचे सावट

ऑक्सफर्डच्या यादीवर कोरोनाचा प्रभाव आहे. यात अॅटी- व्हॅक्सर, अॅटी- मास्क, अॅथ्रोपॉज, बीसी, ब्लॅक लाइव्हज मॅटर, बबल, कोविडिएट, फ्लॅटन द कर्व्ह, ट्विंडेमिक, अनम्यूट, वर्पेशन, झूमबॉम्बिंग यांसारखे शब्द आहेत.

सोशल डिस्टन्सिंग किंवा फ्लॅटर्न द कर्व्ह सारखे शब्द घरोघरी वापरले जात आहेत.

लॉकडाऊन आणि स्टे अॅट होम या शब्दांचाही खूप वापर होत आहे.

आधी रिमोट, व्हिलेज, आयलँड आणि कंट्रोल सारखे शब्द एकाचवेळी दिसायचे. मात्र आता लर्निंग, वर्कींग आणि वर्क फोर्स शब्द दिसू लागलेत. यंदा शब्दही दहशतीत राहिले. मात्र 2021 साल जास्त आनंददायक आणि सकारात्मक शब्द घेऊन येतील, असा ऑक्सफर्डच्या प्रकाशकांना वाटतंय.

आपली प्रतिक्रिया द्या