चिंपांजीतील एडिनोव्हायरस कोरोनाचा ‘काळ’; ऑक्सफर्ड विद्यापीठात वानरांवरील लसीच्या चाचण्या यशस्वी

2305

जगातील अब्जावधी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या कोरोनाचा फैलाव आता लवकरच संपणार आहे. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी चिंपांजी वानरांतील एडिनोव्हायरसमध्ये थोडा फेरफार करून बनवलेल्या लसींचा वानरांवरील प्रयोग यशस्वी ठरला आहे. ऑक्सफोर्डच्या जेनर इन्स्टिट्यूटचे संशोधक म्हणतात कोविड-19 वरील प्रभावी लसीबद्धल निश्चिन्त रहा. ही लस 80 टक्के यशस्वी ठरणार याची हमी आम्ही देतो. आता माणसावरील चाचण्यांतून या लसीचे काही साईडइफेक्ट आहेत का याकडे संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहेत. सप्टेंबरमध्ये या लसीचे 10 लाख डोस बनून तयार होतील, असा विश्वासही ऑक्सफोर्डच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

कोरोना लस शोधणाऱ्या प्रकल्पाच्या प्रमुख साराह गिल्बर्ट यांच्या दाव्यानुसार ऑक्सफोर्डची एडिनोव्हायरस लस कोरोनाग्रस्तांवर 80 टक्के यशस्वी ठरेल. कारण चिंपांजींवर केलेल्या चाचण्यांनुसार या वानरांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढली. त्यांच्यात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठीची हार्ड इम्युनिटी तयार करण्यात ही लस यशस्वी ठरली आहे. आता फक्त आम्हाला पाहायचंय की माणसात या लसीने काही साईड इफेक्ट दिसतात का, पण चिंतेचे कारण नाही ,आपण लवकरच कोरोनाप्रतिबंधक लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करू, असा विश्वासही गिल्बर्ट यांनी व्यक्त केल्याची माहिती न्यूयॉर्क टाइम्सने दिली आहे.

एडिनोव्हायरस लसीची मोडस ऑपरेण्डी
चिंपांजी वानरांच्या असणाऱ्या एडिनोव्हायरस (ChAdOx1)या सर्दीच्या कॉमन विषाणूच्या जिनेटिक रचनेत काहीसे बदल करून ऑक्सफोर्डच्या संशोधकांनी नवा व्हायरस तयार केला आहे. त्यात कोरोना व्हायरसचे काही जिनही (गुणसूत्रे ) वापरण्यात आली आहेत. या एडिनोव्हायरसची लस माणसाला टोचली की त्यातील व्हायरस मानवी पेशींत शिरून विशिष्ट प्रकारचे प्रोटीन बनवण्यास त्या पेशींना भाग पाडतील. हे प्रोटीन मानवी पेशींची इम्युनिटी वाढवतील आणि कोरोनाच्या पेशींतील प्रोटीनचा खात्मा करणे मानवी पेशींची सोपे होईल. मानवी पेशींत कोरोनाला संपवणाऱ्या अँटीबॉडीस तयार करण्याचे काम नवी लस करणार आहे. भविष्यात ही लस प्रभावी ठरल्यास जीवघेण्या कोरोना आजाराचा प्रतिबंध करणेही सहज शक्य होणार आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.

चाचणीचा दुसरा टप्पा सुरु
चिंपांजीवरील यशस्वी चाचण्यांनंतर आता माणसावर या लसीच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. 500 जणांना या नव्या लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यांच्यावर लसीचा काही साईडइफेक्ट होतो का हे पाहून पुढच्या 5 हजार स्वयंसेवकांना लसीचा डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर लसीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरु केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या