साकीनाक्यातील ऑक्सिजन सिलिंडरचा काळाबाजार उद्ध्वस्त

कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून राज्य सरकार ऑक्सिजन मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना साकीनाक्यात दोन भामटे याचाच गैरफायदा उचलत होते.

ऑक्सिजनची मागणी लक्षात घेऊन त्यांनी बेकायदेशीर ऑक्सिजन सिलिंडरचा साठा करून ते सिलिंडर काळय़ाबाजारात गरजूंना अवाच्या सवा भावाने विकत होते. याची माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-10 च्या पथकाने साकीनाक्यात धडक कारवाई करत ऑक्सिजन सिलिंडरचा सुरू असलेला काळाबाजार उद्ध्वस्त केला.

काही भामटे साकीनाका येथे ऑक्सिजन सिलिंडरचा बेकायदेशीर साठा करून मग ते सिलिंडर आहे त्या किमतीपेक्षा जास्त किमतीने विकत असल्याची खबर युनिट-10 चे एपीआय चौधरी यांना मिळाली. त्यानुसार उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक किरण लोंढे, एपीआय चौधरी, सांडभोर, तोडकर व पथकाने गेल्या दोन आठवडय़ांपासून कसून तपास केला. त्यानंतर साकीनाका येथील काजूपाडा परिसरात बॉम्बे क्रिएशन नावाने असलेल्या एका गोदामावर छापा मारला. तेव्हा तेथे 10 ऑक्सिजन सिलिंडर आणि पाच ऑक्सिजन सिलिंडर किट मिळून आले. हा साठा करणाऱया इस्माईल कासिम अली अन्सारी (38) याला पकडल्यानंतर त्याने हे सिलिंडर घाटकोपरच्या भटवाडीत राहणाऱया सचिन रामशेर सिंग याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी सचिन सिंगला ताब्यात घेतल्यानंतर त्याने दुकानात साठा केलेले 21 ऑक्सिजन सिलिंडर सापडले. अशा प्रकारे दोघांकडून पोलिसांनी 31 ऑक्सिजन सिलिंडर आणि पाच ऑक्सिजन सिलिंडर किट जप्त केले.

सचिनच्या चौकशीत आणखी झोल समोर आला. ऑक्सिजन सिलिंडरच्या व्यवसाय करायचा परवानाच सचिनकडे नव्हता. मात्र तरीदेखील गेल्या दीड वर्षापासून सचिन ऑक्सिजन सिलिंडरचा काळाबाजार करीत होता. तो त्याच्या मित्राच्या परवान्याचा गैरवापर करून ऑक्सिजन सिलिंडरचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या