आम्ही तुमच्यावर थुंकतो, तुम्ही टीएमसीचे दलाल आहात! चिदंबरम यांचा काँग्रेस समर्थक वकिलांकडून निषेध

आम्ही तुमच्यावर थुंकतो, तुम्ही तृणमूल काँग्रेसचे दलाल झाला आहात अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री पी.चिदंबरम यांचा काँग्रेस समर्थक वकिलांनी निषेध केला. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी कोलकाता उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेला विरोध करण्यासाठी चिदंबरम हे न्यायालयात आले होते. यावेळी त्यांचा काँग्रेस समर्थक वकिलांनी कडाडून विरोध केला. अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रभारी असून त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात एक याचिका दाखल केली आहे.

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. 2018 साली त्यांनी हे आरोप करत असताना एक याचिका कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयद्वारे केला जावा अशी त्यांनी याचिकेद्वारे मागणी केली होती.

बंगालमधील मेट्रो डेअरी चे 47 टक्के शेअर्स केवेंटर्स अ‍ॅग्रो लिमिटेड या कंपनीला विकण्यात आले होते. या कंपनीने हे शेअर खरेदी केल्यानंतर 15 टक्के शेअर्स सिंगापूरमधील एका कंपनीला हस्तांतरीत केले होते. 2011 पासून ममता बॅनर्जी सरकारने केलेली ही एकमेव निर्गुंतवणूक होती असं चौधरी यांचं म्हणणं आहे. काँग्रेस नेते पी.चिदंबरम हे देशातील नावाजलेल्या वकिलांपैकी एक असून त्यांनी या खटल्यात केवेंटर्स अ‍ॅग्रो लिमिटेडचं वकीलपत्र घेतलं आहे. त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात चौधरी यांनी दाखल केलेली याचिका रद्द करावी अशी मागणी केली. ही मागणी ऐकल्याने संतापलेल्या काँग्रेस समर्थक वकिलांनी त्यांना न्यायालयाबाहेर पडताना कडाडून विरोध केला. चिदंबरम यांना घेराव घालत या वकिलांनी तुम्ही “तृणमूल काँग्रेसचे दलाल झाला आहात’ असा आरोप करत निषेध केला.

पश्चिम बंगालमधील काँग्रेस नेते आणि वकील कौस्तव बागची हे चिदंबरम यांचा निषेध करताना दिसून आले. त्यांच्यासोबत एक महिला वकिलही होती. बागची यांनी चिदंबरम यांना त्यांच्या तोंडावर निषेध केला. तुम्ही दलाल असून आम्ही तुमच्यावर थुंकतो, तुमच्यासारख्या नेत्यांमुळे पश्चिम बंगालची अवस्था वाईट झालीय अशी दूषणे बागची यांनी चिदंबरम यांना दिली. या निषेधामुळे चिदंबरम यांच्यावर फारसा फरक पडलेला दिसत नव्हता. ते निषेध होत असताना आपल्या गाडीत बसून शांतपणे तिथून निघून गेले. या प्रकाराबाबत बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की जर चिदंबरम यांच्यासारखा नेता हा खटला लढणार असेल तर मी काय बोलू शकतो? हा एक मोठा घोटाळा असल्याने मी या प्रकरणात जनहित याचिका दाखल केली आहे.