पॅडी आर्ट -भाताच्या रोपांची रांगोळी

115

मेधा पालकर

पुण्यातील एक हौशी वनस्पती शास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांच्या प्रयत्नांतून गेल्या वर्षी सिंहगड रस्त्याकरील डोणजे फाटा येथे पहिले ‘पॅडी आर्ट’ साकारण्यात आले होते. व्यवसायाने उद्योजक असलेल्या इंगळहळीकर यांनी जपानमधील हे ‘पॅडी आर्ट’ पुण्यात आणले. यामधूनच साकारलेला गणपती पुणेकरांसाठी आकर्षण ठरला होता. यंदाही ही कला साकारण्यात येणार आहे. भाताच्या रोपांची लागवड करताना ती विशिष्ट आकारामध्ये करण्यात येते. भाताच्या रोपांची ही रांगोळी खूपच आकर्षक दिसते. ऑगस्ट महिन्यात ही पॅडी आर्ट पुन्हा एकदा साकारली जात आहे. या कलेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्ह्यात असलेले इनाकादाते या गावात या ‘पॅडी आर्ट’चा जन्म झाला. या भागात भातशेती वर्षानुवर्षांपासून करण्यात येते. या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भातशेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते. काही वर्षांपूर्वी या भातशेतीला तब्बल २००० वर्षे पूर्ण झाल्याचे या भागातील शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या परंपरेला एक उत्सवाच्या रूपात साजरे करायचे ठरविले. यामधूनच या ‘पॅडी आर्ट’ अर्थात ‘टॅम्बो आर्ट’ला १९९३ साली जपानमध्ये सुरुवात झाली. या उत्सवात शेतकऱ्यांनी भातशेतीमध्ये आपल्या कलेचा वापर करीत ‘माऊंट इवाकी’चे मोठे चित्र साकारले. हे साकारत असताना शेतीचा पृष्ठभाग हा एका कॅनव्हाससारखा वापरला गेला व विविध रंगातील भातशेतीच्या मदतीने ‘माऊंट इवाकी’चे चित्र साकारले गेले. यामध्ये भातपिकाच्या पानांची रंगसंगती साकारत तयार केलेले हे ‘पॅडी आर्ट’ सर्वांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर इनाकादाते या गाकासाठी हा उत्सव जणू एक वार्षिक उत्सवच ठरला. आज दरवर्षी हा उत्सव पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक या ठिकाणी दाखल होतात. या गावातील शेतकरीसुद्धा अतिशय उत्साहाने मोनालिसा, मर्लिन मन्रो यांसारख्या विविध कलाकृती साकारत हा उत्सव प्रत्येक वर्षी एका उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील असतात.

इनाकादाते या गावात होणाऱ्या या उत्सवाची माहिती श्रीकांत इंगळहळीकर यांना इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली. त्यापासूनच प्रेरणा घेऊन त्यांनी सिंहगड रस्त्याकरील डोणजे फाटा येथे असलेल्या त्यांच्या ‘लेक्सॉन किंडर्स’ या कंपनीच्या आकारात या ‘पॅडी आर्ट’ पासून गणपती साकारला. हा गणपती तब्बल ४० मीटर लांब आणि दोन रंगांमध्ये साकारण्यात आला. ग्रामीण भागातील शिकलेल्या तरुणांनी पुन्हा शेतीकडे आकर्षित व्हावे या उद्देशाने या ‘पॅडी आर्ट’ची निर्मिती करण्यात आली आहे. हे ‘पॅडी आर्ट’ उंचावरून मनमोहक दिसते. त्यामुळे ही कला आपल्याकडे रुजेल असा विश्वास इंगळहळीकर यांनी व्यक्त केला.

पश्चिम घाटातील वनस्पती एका क्लिकवर
महाराष्ट्रातील पश्चिम घाटाविषयी केवळ जगभरातील वनस्पतीप्रेमींना आकर्षण आहे. इथल्या दुर्मिळ वनस्पतींच्या अभ्यासासाठी येणाऱ्या वनस्पतींशास्त्रज्ञांची संख्या मोठी आहे. हे लक्षात घेऊन श्रीकांत इंगळहळीकर यांनी ‘फ्लॉवर्स ऑन सह्याद्री’ हे अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे पश्चिम घाटातील जवळपास २२०० प्रकारच्या वनस्पतींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे.

वृक्षलागवड ही लोकचळवळ
‘१ ते ७ जुलै वृक्षलागवड सप्ताह राज्यात साजरा होत आहे. खर तर, यामध्ये जनतेचाच सहभाग असतो. वृक्षलागवडीचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून पटवून देण्याचा हा उपक्रम आहे. वृक्षलागवड ही सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक माणसाचा यामध्ये सहभाग असला पाहिजे. वृक्षलागवड ही लोकांनी लोकांसाठी सुरू केलेली चळवळ आहे. जसे आपण वाहतुकीचे नियम करतो. ते जर पाळले नाहीत तर त्याचे तोटे सहन करतो. त्याचप्रमाणे वृक्षलागवडीच्या नियमाचे आहेत. लावलेल्या प्रत्येक रोपाचे संवर्धन करण्याची जबाबदारी लोकांची आहे. लोकांचा उत्साह नसला तरी सरकार दरवर्षी या कार्यक्रमांची घोषणा करते. आता लोकांना वृक्षलागवडीचे महत्त्व पटल्यामुळे लोकसहभाग वाढतो आहे.’
– श्रीकांत इंगळहळीकर

आपली प्रतिक्रिया द्या