धरणबाधितांचा भाजप उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्धार

27

सामना प्रतिनिधी । मुरबाड

एक छदामही न देता कालव्यासाठी जमिनी बळकावणाऱया भाजप सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार पाडाळे धरणबाधितांनी केला आहे. त्यासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पैसा आणि सत्तेच्या जोरावर निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलेल्या भाजप नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

पाडाळे धरण कॅनलच्या बांधकामासाठी पाडाळे, ठुणे, माजगाव, मानीकली, नांदगाव या पाच गावांतील १६२ शेतकऱयांच्या जमिनींचे पाटबंधारे विभागाने कायदेशीर भूसंपादनाकरिता कालवा खोदला. या विरोधात दीड वर्ष शेतकऱयांनी लढा देऊनही सरकारने जमिनीचा मोबदला दिला नाही. संतापजनक म्हणजे आमदार किसन कथोरे यांनी ठेकेदाराची पाठराखण करीत शेतकऱयांना वाऱयाकर सोडून दिले. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवारांना मतदान न करण्याचा इशारा गावकऱयांनी दिला आहे. शेतकऱयांच्या या निर्णयामुळे भाजप नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे.

उमेदवारच मिळत नाही
पाडाळे धरणबाधितांनी मतदान न करण्याचा इशारा दिल्याने भाजपला एक आमदार आणि खासदार असूनही या परिसरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवार मिळेनासे झाले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना अंबरनाथमधील दलबदलूंना तेथे उमेदवारी देण्याची नामुष्की ओढावली आहे.

कथोरेंनी विश्वासघात केला
शेतकऱयांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर विश्वास ठेवून कालव्यासाठी जमिनी दिल्या. मात्र मोबदला देण्याची वेळ आली त्यावेळी भाजपने ठेकेदाराची बाजू घेत कानाडोळा केला. हा आमच्याशी केलेला विश्वासघात आहे. याची किंमत भाजपला चुकवावीच लागेल, असा संताप शेतकरी गुरुनाथ पष्टे, माजी सरपंच तानाजी पष्टे यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या