शरद पवार, मुरलीमनोहर जोशी, येसूदास यांना ‘पद्मविभूषण’

89

नवी दिल्ली – राजकारण, समाजकारण आणि कृषी क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेते शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी, ज्येष्ठ गायक येसूदास, ज्येष्ठ शास्त्र्ाज्ञ यू. रामचंद्र राव, सद्गुरू जग्गी वासुदेव, दिवंगत नेते पी. ए. संगमा, सुंदरलाल पटवा यांना ‘पद्मविभूषण’ हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. ज्येष्ठ मोहन विणावादक विश्वमोहन भट्ट यांच्यासह सात जणांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी, प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, गायक कैलास खेर, हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर, प्रसिद्ध शेफ संजीव कपूर, पत्रकार, लेखक भावना सोमय्या, तामीळनाडूतील सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता रघुनाथ भिडे, उत्तर प्रदेशातील डॉ. मदन माधव गोडबोले यांच्यासह ७५ जणांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजकारण, राजकारण, अध्यात्म, प्रशासन आदी क्षेत्रातील ८९ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला. यात सात पद्मविभूषण, सात पद्मभूषण, ७५ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवरांत १९ महिला आणि पाच विदेशी आणि अनिवासी हिंदुस्थानी आहेत. सहा जणांना मरणोत्तर पद्म सन्मान देण्यात आला आहे. या वर्षी सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आलेला नाही.

दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे लोकसभेचे माजी सभापती, हिंदुस्थानच्या ईशान्य भागातील दिवंगत नेते पी.ए. संगमा आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते सुंदरलाल पटवा यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला आहे. हिंदी, मल्ल्याळीसह अनेक भाषांत आपल्या गायनाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ गायक येसूदास, अध्यात्मिक गुरू, सद्गुरू जग्गी वासुदेव आणि ज्येष्ठ शास्त्र्ाज्ञ यू. रामचंद्र राव यांना पद्मविभूषण सन्मानित करण्यात येणार आहे.

पद्मविभूषण

शरद पवार, डॉ. मुरलीमनोहर जोशी, येसुदास, प्रो. यू. रामचंद्र राव, सद्गुरू जग्गी वासुदेव, सुंदरलाल पटवा, पी.ए. संगमा

पद्मभूषण

विश्वमोहन भट (ज्येष्ठ मोहन वीणावादक), डॉ. तेहेमटन उडवाडिया (फादर ऑफ लेप्रोस्कोपीक सर्जरी), रत्न सुंदर महाराज (गुजरातमधील अध्यात्मिक गुरू), प्रो. डॉ. देवीप्रसाद द्विवेदी (ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक), निरंजन नंदा सरस्वती (योगगुरू), चो. रामास्वामी (तामिळनाडूतील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार), प्रिन्सेस महाचक्री शिरीनध्रोन (थायलंड)

७५ जणांना पद्मश्री; प्रसिद्धीपासून दूर असलेल्या अनेकांचा सन्मान

अप्पासाहेब धर्माधिकारी (समाजिक कार्य, ज्येष्ठ निरूपणकार), बाबा बलबिरसिंग सेचवाल (पंजाबमधील समाजिक कार्यकर्ते), गिरीश भारद्वाज (कर्नाटकातील समाजिक कार्यकर्ते), करीमूल हक (पश्चिम बंगालमधील समाजिक कार्यकर्ते), बिपीन गणात्रा (कोलकात्ता येथील गेल्या चाळीस वर्षांतील प्रत्येक आगीच्या वेळी धावून जाणारे अग्निशामन दलातील कर्मचारी), निवेदिता रघुनाथ भिडे (तामिळनाडूतील सामाजिक कार्यकर्त्या), डॉ. सुनीती सोलोमन (१९८५मध्ये एड्सच्या पहिल्या रुग्णावर उपचार करणाऱया डॉ. सुनीती यांना मरणोत्तर पद्मश्री), दारापल्ली रमय्या (तेलंगणात हजारो वृक्षांची लागवड आणि संगोपन), सी. मल्लेशम (तेलंगणात सिल्क साडय़ा विणण्यासाठी मशीनचा शोध), मिनाक्षी अम्मा (केरळमधील ढाल आणि तलवारबाजी या खेळाचा प्रसार करणाऱया ७६ वर्षीय महिला), सुकरी बोमागौडा (कर्नाटकातील आदिवासी हल्लाकी या संगीताचे जतन करणाऱया प्रसिद्ध गायिका), डॉ. भक्ती यादव (९१ वर्षीय महिला डॉक्टर. गेली ६८ वर्षे हजारो गरीबांवर मोफत उपचार), डॉ. सुहास मापूसकर (महाराष्ट्रातील सामजिक कार्यकर्ते यांचा मरणोत्तर सन्मान), बाओ देवी (बिहारमध्ये पुरातन मधुबनी चित्रकलेचे जतन), इला अहमद (१९७०पासून आसाममध्ये महिलांसाठी मासिकाचे संपादन), जितेंद्र हरिपाल (ओडिशातील कोसली-संबलपुरी पारंपरिक संगीताचा प्रसार), मरिअप्पन थंगवेलू (अपंगत्वावर मात करत २०१६च्या पॅरालंम्पिकमध्ये सुवर्णपदक), शेखर नायक (अंधांसाठीच्या क्रिकेट संघाचा कर्णधार. टी-२० आणि विश्वचषक विजेता) याचप्रमाणे अनेक मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. त्यात प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, गायक कैलाश खेर, क्रिकेट कर्णधार विराट कोहली, ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्टिकपट्टू दीपा कर्माकर, थाळीफेकपटू विकास गौडा, हॉकीपट्टू टी.आर. श्रीजेश, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. नरेंद्र कोहली, जम्मू-कश्मीरातील ज्येष्ठ लेखक काशिनाथ पंडित, लेखक कामूकृष्ण शास्त्री, हरिहर कृपाल त्रिपाठी, उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध डॉ. मदन माधव गोडबोले, गुजरातमधील डॉ. देवेंद्र दयाभाई पटेल, प्रसिद्ध शेफ संजीव कपूर, प्रसिद्ध पत्रकार, लेखक भावना सोमय्या आदींचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला आहे.

डॉ. तेहम्तन उद्वाडिया यांना पद्मभूषण

डॉ. तेहम्तन उद्वाडिया हे गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट म्हणजे पचनसंस्थेशी संबंधित सर्जन आहेत. त्यांना लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेचे पितामह मानले जाते. डॉ. उद्वाडिया ब्रीच कॅण्डी आणि हिंदुजा रुग्णालयात जनरल सर्जन म्हणून कार्यरत आहेत.

सिंधुदुर्गचे सुपुत्र शहीद जवान पांडुरंग गावडे यांना शौर्यचक्र

कश्मीरात पाच दहशतवाद्यांचा खात्मा करणारे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अंबोलीतल्या मुळवंदवाडी या गावचे सुपुत्र शहीद जवान नायक पांडुरंग महादेव गावडे यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ बहाल केले जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बहाद्दर 398 जवानांना शौर्य पदके जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर 7 जणांना तटरक्षक दलातील पदके जाहीर झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या