आझाद व्हा गुलाम होऊ नका! गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्कार मिळणार असल्याने काँग्रेसचा नेता संतापला

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पद्म पुरस्कार ज्या व्यक्तींना दिले जाणार आहेत, त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचेही नाव आहे. त्यांचा पद्म पुरस्काराने सन्मान केला जाणार असल्याने काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाने आझाद यांचे कौतुक केले आहे तर दुसऱ्या गटाने नाक मुरडत त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. टीका करणाऱ्यांमध्ये माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांचेही नाव सामील आहे. त्यांनी नाव न घेता आझाद यांच्यावर टीका केली आहे.

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार होते, मात्र त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांचं हे उदाहरण देत रमेश यांनी एक टि्वट केलं आहे, ज्यात त्यांनी म्हटलंय की “योग्य निर्णय घेतला, ते आझाद राहू इच्छितात; गुलाम नाही”

रमेश यांनी जरी टीका केली असली तरी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मात्र गुलाम नबी आझाद यांचं पद्म पुरस्काराने सन्मानित होत असल्याबद्दल अभिनंदन केलं. त्यांनीही एका ट्विट द्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. थरूर यांनी म्हटलंय की “सार्वजनिक आयुष्यातील योगदानाबद्दल दुसऱ्या पक्षाच्या सरकारकडून सन्मानित होणं ही चांगली बाब आहे.”

अभिनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर यांनीही आझाद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही मला मोठ्या भावाप्रमाणे असून तुमचे जीवन हे प्रेरणादायी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

पद्म पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर कोणीतरी अफवा पसरवली होती की गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलमधून काँग्रेस पक्षाचे नाव हटविले आहे. आझाद यांनी एक ट्विट करत या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षामध्ये आमूलाग्र व्हावा अशी आग्रही मागणी करणारा एक गट तयार झाला असून याला जी-23 गट असं म्हटलं जातं. गुलाम नबी आझाद हे या गटातील प्रमुख नाव आहे. यामुळे गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असणाऱ्यांच्या ते सातत्याने निशाण्यावर असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा जाहीररित्या आझाद यांची तारीफ केली आहे. ही बाब देखील काँग्रेसमधल्या काहींना खटकते आहे.