महाराष्ट्रातील त्या ६ जणांचा गौरव म्हणजे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब- छगन भुजबळ

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे. सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार तर नामदेव कांबळे यांना साहित्याबद्दल, कला क्षेत्रातील परशुराम गंगावणे आणि उद्योग श्रेत्रासाठी जसवंतीबेन पोपट यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर महाराष्ट्रातील उद्योजक रजनीकांत देविदास श्रॉफ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या 6 जणांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.

या सर्व मान्यवरांचे अभिनंदन करतानाच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या 6 जणांचा गौरव म्हणजे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना देखील व्यक्त केली आहे… महाराष्ट्रातील सामाजिक,राजकीय ,उद्योग आणि कला विश्वाचा हा गौरव असल्याचे मत देखील भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले लोककलावंत परशुराम गंगावणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कळसुत्री बाहुल्यांच्या खेळातून जनजागृती, लोकप्रबोधन करत असतात संपूर्ण महाराष्ट्राला अनाथांची माय असलेल्या सिंधुताईं आपल्या सर्वांना परिचित आहेत, साहित्यिक नामदेव कांबळे यांच्यासारख्या ध्येयवेड्या व्यक्तिमत्वांचा पद्मपुरस्काराने झालेला सन्मान हा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.याचबरोबर फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातील पद्म पुरस्कारांनी सन्मानीत झालेल्या मान्यवरांचे देखील मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे व सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या