शिवलकर, साळगावकर सन्मान सोहळा दिमाखात संपन्न

575

हिंदुस्थानी क्रिकेटमधील दोन उपेक्षित पद्माकर शिवलकर आणि पांडुरंग साळगावकर यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा मंगळवार, 3 डिसेंबरला वांद्रय़ाच्या नॅशनल लायब्ररीच्या सभागृहात हृद्यपणे पार पडला. आयडीबीआय, फेडरल इन्शुरन्स, स्वरा आर्टस् आणि नॅशनल लायब्ररी यांनी हा सोहळा आयोजित केला होता. तीन तास विविध चर्चासत्रे आणि प्रगट मुलाखतींनी नटलेल्या या सोहळ्याने जमलेल्या क्रिकेट रसिकांना खिळवून ठेवले होते.

सभेत आधी शृंगारपुरे या युवकाने स्टार क्रिकेट समालोचकाचे हुबेहूब आवाज काढून दाखवले. हलक्याफुलक्या अशा या सुरुवातीनंतर क्रीडा समीक्षक विजय लोकापल्ली यांनी संजय बांगर आणि प्रवीण अमरे यांना क्रिकेट प्रशिक्षकाच्या महत्त्वावर बोलते केले तेव्हा संजयने काही मार्मिक टिप्पणी केल्या. त्याने सांगितले, प्रशिक्षकाने आपल्यावर झोत घ्यायचा नसतो. खेळाडू खरं तर प्रशिक्षकाला झोतात आणतात. त्याने खेळाडूंच्या केवळ क्रिकेटच्या तांत्रिक समस्याच नव्हे तर घरगुती समस्याही जाणून घ्यायच्या असतात. प्रवीणने आयपीएलसाठी प्रशिक्षकपद भूषवणेही सोपे नसल्याचे स्पष्ट केले. एकेका खेळाडूवर कैक पैसे खर्च केले गेलेले असतात याचे भान ठेवावे लागते. यानंतर सुलक्षण कुलकर्णीने अपंग क्रिकेट संघाबद्दलही खूप किस्से सांगितले. पुन्हा एक हलकाफुलका कार्यक्रम म्हणून विनोद कांबळी, विजय लोकापल्ली आणि द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेटशौकिनांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरे दिली. हे प्रश्न मकरंद भोसले यांनी विचारले. या कार्यक्रमाची सांगता मग आजही छान गाणाऱ्या शिवलकरने शांताराम नांदगावकर यांचे ‘हा चेंडू दैवगतीचा’ हे गाणे गाऊन केली तेव्हा सारे क्रिकेट रसिक मंत्रमुग्ध झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश आजगावकर यांनी समर्थपणे केले. कार्यक्रमाची संकल्पना द्वारकानाथ संझगिरी यांची होती.

आपली प्रतिक्रिया द्या