‘राणी पद्मावती’ सिनेमात आक्षेपार्ह दृश्य नाहीत, भन्साळी नमले

65

सामना ऑनलाईन । मुंबई

जयपूरमध्ये ‘राणी पद्मावती’ या ऐतिहासिक चरित्रावर सिनेमा चित्रित करताना राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात प्रणय प्रसंग दाखवल्याचा आरोप करत ‘करणी सेने’च्या कार्यकर्त्यांनी दिग्ददर्शक संजय लिला भन्साळी यांना मारहाण केली. मात्र या सिनेमात राणी पद्मावती यांचा अपमान करणारे कोणतेही दृश्य नाही, तसे चित्रणही करण्यात आलेले नाही, असे सिनेमा निर्माते भन्साळी प्रोडक्शनकडून आज स्पष्ट करण्यात आले. मात्र या स्पष्टीकरणानंतर सिनेमाचे उर्वरित चित्रिकरण सुरू होणार का हा प्रश्न कायम आहे.

राणी पद्मावती यांनी स्त्रियांची अब्रू वाचवण्यासाठी केलेल्या बलिदानामुळे त्या राजपूतच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानसाठी प्रेरणादायक चरित्र ठरल्या आहेत. असे असताना देखील या ऐतिहासिक चरित्रावर चित्रपट बनवताना भन्साळी यांनी राणी पद्मावती यांची भूमिका वठवणारी अभिनेत्री दीपिका पडुकोण आणि अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका वठवणारा अभिनेता रणवीर सिंह यांच्यावर एक प्रणय प्रसंग चित्रित केल्याची बातमी जयपूरमध्ये पसरली. केवळ सिनेमासाठी म्हूणून ऐतिहासिक घटनांपेक्षा वेगळी घटना दाखवताना राणी पद्मावती यांचे चारित्र्य हनन करणारे हे दृश्य असल्याने संतापलेल्या करणी सेनेने भन्साळी यांच्या सेटवर जाऊन विरोध केला आणि भन्साळी यांना धक्काबुक्की देखील केली. त्यामुळे देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. बॉलीवूडने नेहमीप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे सांगून निषेध केला. तर राजपूत समाजाने ऐतिहासिक घटनांची मोडतोड केलेली चालणार नाही असे म्हणत करणी सेनेचे समर्थन केले. अखेर भन्साळी यांनी आपण सिनेमाचे चित्रण थांबवत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे राजपूत नमतील अशी त्यांची आशा होती. मात्र तसे झाले नाही.

सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी आता भन्साळी प्रोडक्शनने स्वत: एक पाऊल मागे घेत राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आलेले नाही, असे स्पष्ट केले आणि संघटनांनी सहयोग केल्यास पुन्हा चित्रिकरण सुरू करू असेही सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या