‘पद्मावती’ सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना परत पाठवला

35

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘पद्मावती’ चित्रपट सेन्सॉर बोर्डाने आज निर्मात्यांना परत पाठवला असून मार्गदर्शक तत्त्वानुसार त्या चित्रपटाचे पुन्हा परीक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या १ डिसेंबरला होऊ घातलेले ‘पद्मावती’चे प्रदर्शन आता लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘पद्मावती’ चित्रपट काही तांत्रिक कारणांमुळे निर्मात्यांना परत पाठविण्यात आला असल्याचे सेन्सॉर बोर्डातील सूत्रांनी स्पष्ट केले.

मोदींनी ‘पद्मावती’वर बंदी घालावी; अजमेर दर्ग्याच्या प्रमुखांची मागणी
‘पद्मावती’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे सलमान रश्दी, तस्लिमा नसरीन, तारीक फतह यांच्यासारखेच आहेत असे सांगतानाच ‘पद्मावती’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदी घालावी, अशी मागणी अजमेर दर्ग्याचे दिवाण झैनुल अबेदीन अली खान यांनी आज केली. येत्या १ डिसेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट धार्मिक भावना दुखावणारा असून त्याला मुस्लिम समाजानेही विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले. भाषण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरफायदा उठवत सलमान रश्दी, तस्लिमा नसरीन, तारीक फतह यांच्यासारख्या लेखकांनी धार्मिक भावना दुखावण्याचेच काम आजवर केले. दिग्दर्शक भन्साळी हेसुद्धा तेच काम करत आहेत, असे झैनुल अबेदीन यांनी म्हटले आहे.

निर्मात्यांनी इतिहासाचा विपर्यास करू नये
‘पद्मावती’वरून पेटलेल्या वादावर कालपरवापर्यंत ‘सावध मौन’ पाळलेला भाजप आज त्या चित्रपटाला होत असलेल्या विरोधाच्या समर्थनार्थ मैदानात उतरला. ‘आपल्या भावना जपण्याचा अधिकार जनतेला आहे. चित्रपट निर्मात्यांनी संवेदनशीलता राखली पाहिजे. त्यांनी इतिहासाचा विपर्यास करता कामा नये’, असे मत ज्येष्ठ भाजप नेते, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते एका टीव्हीच्या कार्यक्रमात बोलत होते.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे निरंकुश नाही असे सांगून ते म्हणाले की, सर्जनशीलतेच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड कोणी करू नये. चित्रपट निर्मात्यांनी त्याचे भान ठेवले पाहिजे.

‘पद्मावती’चे तिकीट काढण्याआधी विमा काढा; राजपूत सेनेची धमकी
‘पद्मावती’ या चित्रपटावरून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना धमक्या सुरू असतानाच मध्य प्रदेशातील ‘राजपूत सेना’ या संघटनेने आज फेसबुकवरून थेट प्रेक्षकांनाही धमकावले आहे. ‘पद्मावती’ चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर तिकीट काढण्याआधी स्वतःचा विमाही काढून घ्या, अशी धमकी त्या संघटनेने दिली आहे. राजपुतांची तलवार माणसं मोजून डोकी उडवत नाही. त्यामुळे ‘पद्मावती’चे तिकीट काढण्याआधी स्वतःचा विचार करा, असे राजपूत सेनेने प्रेक्षकांना बजावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या