रजपुतांचा उद्रेक! भन्साळीची मस्ती उतरवली!!

32

कोल्हापुरातील ‘पद्मावती’च्या महागडय़ा सेटची राखरांगोळी

कोल्हापूर: वारंवार विरोध करूनही त्याला न जुमानता ‘पद्मावती’चे शूटिंग करणाऱया संजय लीला भन्साळीविरोधात रजपुतांचा उद्रेक झाला. राजस्थानपाठोपाठ कोल्हापुरातील शूटिंगही करणी सेनेने उधळून लावत महागडय़ा सेटची अक्षरशः राखरांगोळी  केली. विशेष म्हणजे या जाळपोळीची जबाबदारीही करणी सेनेने स्वीकारली आहे.

ऐतिहासिक मसाई पठाराच्या सात पठारांपैकी एका पठारावर गेल्या आठवडय़ापासून संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’ चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. यासाठी भव्य आणि दिव्य असा महालाचा सेट उभारण्यात आला आहे. येथे युद्धाचे शूटिंग करण्यात येणार असल्याने यासाठी शेकडो घोडे आणि सहकलाकारांना पाचारण करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत चित्रपटातील प्रमुख कलाकारांचे शूटिंग येथे होणार होते, मात्र भन्साळींना वारंवार इशारा देऊनही ते राणी पद्मावतीचा चुकीचा इतिहास जनतेसमोर मांडत असल्याने रजपूत करणी सेनेने भन्साळींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सेटवर प्रचंड पोलीस आणि खासगी सुरक्षा यंत्रणा तैनात असतानाही पेट्रोलबॉम्ब घेऊन आलेल्या अवघ्या २५ जणांनी आग लावण्यासह वाहनांची तोडफोड केली. एकही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात २५ हल्लेखोरांविरोधात जाळपोळ, मारहाण आदी गुन्हे पन्हाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

जे काही बोलायचे ते मुंबईतच बोलेन! – भन्साळी 

सेटवरील जाळपोळीत किमान तीन ते चार कोटींचे नुकसान झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी जे काही बोलायचे ते मुंबईतच बोलेन अशी प्रतिक्रिया भन्साळी  यांनी दिली.

वारंवार विरोध करूनही भन्साळी न जुमानता मुजोरपणे ‘पद्मावती’ चित्रपटाचे शूटिंग करतोय. राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि कोल्हापुरातील हिंदू संघटनांनी मिळून सेटचे नुकसान केले आहे. करणी सेना प्रमुख लोकेंद्रसिंह कालवी आणि महिपाल सिंह यांच्या आदेशानुसार भविष्यातही आमचे कार्यकर्ते ‘पद्मावती’चे शूटिंग होऊ देणार नाहीत. राणी पद्मावतीचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडणाऱया भन्साळीला यापुढेही असाच धडा शिकवू. – जगदीश भाणुजा,  अध्यक्ष, रजपूत करणी सेना, मुंबई प्रदेश.

आपली प्रतिक्रिया द्या