चित्रकार एम. व्ही. धुरंधर यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त दुर्मिळ प्रदर्शन

474

सामना प्रतिनिधी । मुंबई

स्वातंत्र्यपूर्व काळातील ख्यातनाम चित्रकार महादेव विश्वनाथ ऊर्फ एम. व्ही. धुरंधर यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून कला वाटचालीचा आणि त्यांच्या चित्रशैलीचा मागोवा घेणारे अनोखे प्रदर्शन 11 सप्टेंबरपासून मुंबईतील काळाघोडा येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एनजीएमए)मध्ये भरले आहे. यानिमित्ताने देशविदेशात विखुरलेली धुरंधरांची चित्रे, छायाचित्रे, पोस्टकार्ड यांचा अनमोल ठेवा एका छताखाली आला आहे. महान चित्रकाराच्या प्रेमापोटी कलाप्रेमींनी घडवलेला हा चमत्कारच समजला जात आहे.

रावबहाद्दुर धुरंधर यांचा जन्म 18 मार्च 1867 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. ते शिक्षणासाठी मुंबईत आले. 1890 मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. त्यांची विद्यार्थी म्हणून सहा वर्षे आणि अध्यापक म्हणून 35 वर्षे अशी 41 वर्षांची कलावाटचाल जे. जे. स्कूलच्या प्रांगणात झाली. 1895 मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात सुवर्णपदक मिळवणारे धुरंधर हे पहिलेच हिंदी चित्रकार ठरले. रेखाटने, रंगचित्रे, व्यक्तिचित्रे, पौराणिक आणि निसर्गचित्रांमधील धुरंधर परंपरा सर्वदूर पोचली. देशविदेशातील संग्राहकांकडे त्यांची चित्रे पोचली. धुरंधरांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त प्रदर्शन भरवण्याची संकल्पना एनजीएमएच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ चित्रकार आणि कला अभ्यासक सुहास बहुळकर यांना सुचली. त्यासाठी केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय, महाराष्ट्र राज्य सरकार, दिल्ली आर्ट गॅलरी, स्वराज आर्ट अर्चिव्ह यांचे सहकार्य लाभले. एनजीएमएने देशभरातील कलाप्रेमींना धुरंधरांची चित्रे पाठविण्याचे आवाहन केले. या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातून धुरंधरांच्या चित्रांचा पाच मजली ठेवा रसिकांसाठी खुला झाला आहे. हे प्रदर्शन 13 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 काजेपर्यंत खुले असेल.

प्रदर्शनात काय बघाल
धुरंधर यांनी काढलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, कोल्हापूरच्या अंबाबाईचे चित्र, द्रौपदी वस्त्रहरणाचे रेखाटन, किष्णूचे मोहिनी रूप, लग्नसोहळय़ातील प्रसंग, राधा-कृष्ण, रासलीला, काशीघाट, राम राज्याभिषेक, रामविरह, गरुडवाहन लक्ष्मी, नल-दमयंती, लग्नसोहळय़ातील चित्रे, मानवी सवयी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग, औंधच्या राजाचे दसरा सोहळय़ातील चित्र, ब्रिटनच्या राजाचे हिंदुस्थानातील आगमन आदी रचनाचित्रे, निरनिराळय़ा संस्कृतीतील स्त्रियांची चित्रे, धुरंधरांच्या दोन्ही पत्नींची चित्रे असा प्रदर्शनाचा पसारा आहे.

स्वखर्चाने कलाप्रेमींनी पाठवली चित्रे
एनजीएमएकडे धुरंधर यांची फक्त तीन चित्रे होती. प्रदशर्नासाठी देशविदेशातील संग्राहकांना, कलाप्रेमींना चित्रे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. आश्चर्य म्हणजे एकाही संग्राहकाने एकही पैसा न घेता, वाहतूक पॅकेजिंगचा खर्च न घेता चित्रे पाठवली. हा एक मोठा चमत्कार आहे. सांगली, औंध येथील म्युझियमने चित्रे दिली. स्वराज अर्काइव्हने पदके दिली. दिल्ली आर्ट गॅलरीने पुस्तकाच्या डिझाईनचा सर्व खर्च केला. अनेकांच्या प्रयत्नांतून प्रदर्शन साकार झाले आहे. तमाम मराठी माणसांनी ते एकदा तरी बघावे.
– सुहास बहुलकर, अध्यक्ष, सल्लागार समिती, नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट

प्रदर्शन कुठे? – नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट, काळाघोडा, मुंबई
वेळ – सकाळी 11 ते सायं. 6 वाजेपर्यंत

आपली प्रतिक्रिया द्या