पैशांचा पाऊस भाग १५- शेअर गुंतवणूक आणि लाभांश (Dividend)

256

mahesh-chavan-th
>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

हिंदुस्थानामध्ये पुराणकाळापासून स्थावर मालमत्ता उभारण्यावर भर दिला आहे. स्थावर मालमत्तेच्या आकर्षणापासून देव-देवताही वाचू शकले नाहीत तर आपण सामान्य काय वाचणार. जेव्हा जेव्हा कोणत्याही समारंभात कौटुंबिक किंवा मित्र परिवाराबरोबर गप्पा गोष्टी रंगतात तेव्हा विषय आपसूकच माझ्या व्यवसायावर येतो. कारण “सेन्सेक्स आता कसा आहे पडला आहे की वाढला आहे? हा प्रश्न मला हमखास येतो आणि हे प्रश्न विचारणारे मुख्यत्वेकरून बँकेत FD करणारे ठेवीदार असतात. वर्षाला खात्रीशीर ८% परतावा तुमचा सेन्सेक्स देतो का? नाही ना? अशीच काहीशी नाराजी महिन्याला भाडे घेणाऱ्या स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीची असते आणि त्याचप्रकाराचे उत्पन्न शेअर बाजारात मिळते का? नाही ना ?

अशा वेळी मी मनातल्या मनात हसतो आणि तुमची fixed deposit आणि रिअल इस्टेट गुंतवणूक योग्य आहे हा निर्वाळा मी त्यांना देतो. मी दिलेलं समर्थन त्यांना एक प्रकारचा विजय वाटतो कारण सहसा शेअर बाजारातील गुंतवणूकदार किंवा शेअर बाजारात काम करणारे लोक सहसा माघार घेत नाहीत. पण वरील उदाहरण वाचून तुम्हालाही वाटत असेल, शेअर्स गुंतवणुकीतून आम्हाला असे काही उत्पन्न मिळू शकते का ? तर त्याचे उत्तर आहे हो… आणि ते Dividend (लाभांश) च्या स्वरूपात मिळते पण त्यासाठी तुम्हाला हे सर्व नीट समजून घ्यावे लागेल जे मी त्यांना समजवू शकत नाही.

आज आपण शेअर बाजारातील गुंतवणुकीला एका वेगळ्या नजरेतून पाहणार आहोत आणि त्यातून आपल्याला Dividend (लाभांश) म्हणजे काय ?

• ज्यापणाने एखाद्या मुदत ठेवीमध्ये पैसे ठेवणाऱ्याला वर्षाला किंवा महिन्याला व्याज मिळते.
• ज्याप्रमाणे एखाद्या स्थावर मालमत्तेत भाड्याच्या स्वरूपात रक्कम मिळते
• त्याचप्रमाणे शेअर बाजारातही तुमच्या गुंतवणुकीनुसार तुम्हाला तुम्ही गुंतवणूक केलेल्या कंपनीला फायदा झाल्यास Dividend (लाभांश ) मिळतो

Dividend (लाभांश ) म्हणजे काय ? हे जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू

जेव्हा एखाद्या व्यवसायाची सुरुवात होते तेव्हा तो व्यवसाय करणारा उद्योजक हा एकटा असतो. जसजसा व्यवसायाचा व्याप वाढू लागतो तसतसा तो कर्ज घेऊन किंवा भागीदार घेवून व्यवसायाच्या गरजा पूर्ण करतो. या भागीदारीचे पुढे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आणि त्यानंतर व्यवसायाचा पसारा वाढला तर पूर्ण देशात व्यवसाय पसरवण्यासाठी त्या कंपनीला मोठ्या प्रमाणावर पैसा उभारावा लागतो. एका बाजूला व्यवसायात बसलेला जम आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या दराने उपलब्ध असलेली वित्तीय संस्थांकडून मिळणारी कर्ज. मग पैसा उभारण्यासाठी सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे शेअर बाजारातून भाग भांडवल उभे करणे. अशा पद्धतीने कंपन्या शेअर बाजारात येतात आणि तुमच्या माझ्यासारख्या गुंतवणूकदाराला स्वतःच्या व्यवसायाबद्दल माहिती, त्याच्या उत्पादनाला किंवा सेवांना भविष्यात असलेल्या संधी, कंपनीच्या कार्यकारणी सभासदांची विश्वासाहर्ता यावर भांडवल उभारणी होते. आता जेव्हा आपण या कंपनीचे शेअर्स घेतो म्हणजे काय करतो तर आपण घेतलेल्या शेअर्सच्या प्रमाणात आपण त्या कंपनीचे मालक होतो आणि मालक म्हणजेच कंपनीच्या फायद्या तोट्यातला जबाबदार व्यक्ती. यामुळे जेव्हा कंपनीला तिच्या व्यवसायातून खर्च आणि सर्व प्रकारचे कर किंवा कर्जाचे हप्ते भरून जो फायदा होतो तो कंपनीच्या सर्व शेअर्स धारकांना वाटला जातो यालाच Dividend (लाभांश ) बोलले जाते.

Dividend (लाभांश) बद्दल काही महत्वाच्या बाबी जाणून घेऊ

• Dividend (लाभांश) शेअर्स धारकाकडे असलेल्या शेअर्सच्या संख्येवर दिला जातो.
• Dividend (लाभांश) शेअर्स च्या Face Value वर दिला जातो. म्हणजे जर एखाद्या कंपनीने १००% Dividend दिला म्हणजे तो त्याच्या face value च्या १००% असतो, मार्केट value नुसार नाही.
• ज्या दिवशी कंपनी dividend जाहीर करते त्याला Dividend Declared Date असे म्हणतात.
• Dividend जाहीर करताना तारीख जाहीर केली जाते त्या तारखेला ज्या शेअर धारकांकडे कंपनीचे शेअर्स असतील तेच dividend मिळण्यास पात्र असतात. या तारखेला Record Date असे म्हणतात.
• Record Date च्या आधीच्या २ दिवसाला Ex-Dividend म्हणतात.
• १० लाखापर्यंत मिळणारा वार्षिक Dividend टॅक्स फ्री असतो १० लाखाच्यावर मिळणाऱ्या Dividend वर १०% टॅक्स भरावा लागतो
• Dividend (लाभांश ) चे मुख्य २ प्रकार आहेत Regular Dividend आणि Interim Dividend

१. Regular Dividend:- वर्षभराचा लेखा-जोखा मांडल्यावर राहणारा फायदा हा Regular Dividend च्या माध्यमातून शेअर्स धारकाला दिला जातो.

२. Interim Dividend:- शेअर बाजारात दर ३ महिन्याला कंपन्यांना त्यांचा ताळेबंद सेबीला दाखवावा लागतो त्याचबरोबर ३ महिन्यातील व्यवसाय पाहता हातात काही फायदा राहत असेल तर कंपनी जास्तीचा झालेला नफा शेअर्स धारकांना वाटून टाकते याला Interim Dividend म्हटले जाते.

शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी येणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी Dividend चे उत्पन्न म्हणजे भविष्यातील निवृत्ती नियोजनासाठी एक मदतच आहे. त्यामुळे तुमच्या कमावत्या काळात मिळणारा Dividend ची पुनर्गुंतवणूक करा आणि आपल्या पोर्टफोलिओला मजबुती द्या कारण, पाया जितका मजबूत तितके आपण जास्त मोठा डोलारा उभारू शकतो.

हिंदुस्थानातील शेअर बाजारात काही कंपन्या या दरवर्षी Dividend देणाऱ्या कंपन्या म्हणून ओळखल्या जातात त्या पाहूया.

१. Coal India Limited (CIL)
२. ONGC
३. Tata Consultancy Services (TCS
४. ITC Ltd.
५. Infosys
६. NTPC Ltd
७. Hindustan Zinc
८. NMDC
९. HUL
१०. Reliance Industries Ltd. (RIL)

वरील कंपन्या या ठराविक कालांतराने आपल्या गुंतवणूकदारांना खुश ठेवण्यासाठी Dividend जाहीर करतच असतात. मी काही असे संयमी गुंतवणूकदार पहिले आहेत ज्यांनी १५-२० वर्षापूर्वी त्यांनी शेअर्स ज्या किंमतीत घेतले होते तेवढ्या किंमतीचे डिविडेंड आज ते वर्षाकाठी मिळवत आहेत. डिविडेंडचे उत्पन्न हे कोंबडीच्या अंड्यासारखे आहे. शेअर गुंतवणूक आणि लाभांश (Dividend) हा लेख कसा वाटला नक्की कळवा. लक्षात ठेवा संयम ठेवणाऱ्याला शेअर बाजार एक एक संपत्तीचा दरवाजा उघडून दाखवत असतो आणि आपण प्रत्येक लेखामागे तेच करत आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या