पैशांचा पाऊस भाग १७ – शेअर बाजाराचे सर्किट फिल्टर

61

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

बहुतेक वेळा आपण वर्तमान पेपर किंवा न्यूज चॅनेलला आपण शेअर बाजाराबद्दल बातम्या बघतो तेव्हा
• सेन्सेक्सची १२०० पॉईंटची उसळी
किंवा
• सेन्सेक्स १५०० पॉईंट ने गडगडला
अशा बातम्या आपण ऐकत असतो. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या आणि न करणाऱ्यांनाही या बातम्या आकर्षित करतात. कारण या चढ उतारावर शेअर बाजारातील फायदा आणि नुकसानीचे गणित बनत असते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना जितके जमेल तितके सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी शेअर बाजारातील संस्था, सेबी किंवा RBI काम करत असतात. त्यापैकीच एक व्यवस्था म्हणजे सर्किट फिल्टर. सर्किट फिल्टर ही एक जबरदस्त प्रभावी व्यवस्था आहे जिच्यामुळे शेअर बाजारातील मोठ्या चढ उतारावर लगाम लावला जातो.

सर्किट फिल्टर यंत्रणा कशी काम करते?
सर्किट फिल्टर यंत्रणा तीन स्तरावर काम करते

१. १०% चढ किंवा उतार
२. १५% चढ किंवा उतार
३. २०% चढ किंवा उतार

सर्किट फिल्टर यंत्रणा सर्व मार्केटला लागू होते जसे की सेन्सेक्स, निफ्टी, मधील कॅश मार्केट, डेरिव्हेटीव्ज मार्केट. आता आपण पाहूया सर्किट फिल्टर यंत्रणा कशा पद्धतीने या तीन स्तरावर काम करते.

१. १०% चढ किंवा उतार :- एखाद्या दिवशी जर मार्केटमध्ये १०% पेक्षा जास्त चढ किंवा उतार झाला तर मार्केट मध्ये काही वेळासाठी सर्व व्यवहार थांबवले जातात. ही १०% ची चढ किंवा उतार कधी झाला आहे हे महत्वाचे आहे. ते आपण बघूया.
• दुपारी १ च्या आधी :- १ तासासाठी बाजारातील व्यवहार बंद केले जातात.
• दुपारी १ ते २. ३० च्या मध्ये :- १/२ तासासाठी व्यवहार बंद केले जातात.
• दुपारी २. ३० नंतर कधीही :- व्यवहार चालू ठेवले जातात.

२. १५% चढ किंवा उतार :- १५% पेक्षा जास्त चढ- उतार झाल्यावर

• दुपारी १ च्या आधी :- २ तासासाठी बाजारातील व्यवहार बंद केले जातात.
• दुपारी १ ते २.०० च्या मध्ये :- १ तासासाठी व्यवहार बंद केले जातात.
• दुपारी २.०० नंतर कधीही :- व्यवहार पूर्णपणे बंद केले जातात.

३. २०% चढ किंवा उतार :- २०% पेक्षा जास्त चढ-उतार झाला तर त्या दिवसासाठी व्यवहार पूर्णपणे स्थगित केले जातात.
• २०% पेक्षा जास्त चढ-उतार जास्तकरून मार्केट सुरु होतानाच बघायला मिळतात कारण १०% आणि १५%चे सर्किट फिल्टर असल्यामुळे तो स्तर गाठल्यावर आपोआप मार्केट रिक्त फिल्टर यंत्रणेवर काम करते.

आतपर्यंत ५-६ वेळा अशी परिस्थिती सेन्सेक्स आणि निफ्टीवर आली आहे. त्यावर उद्या सविस्तर लिहितो. तुम्ही याची माहिती घ्या आणि कमेंट करा. जितका जास्त शोध घ्याल, अभ्यास कराल तितके जास्त समजेल. सर्किट फिल्टर यंत्रणा दिसताना विचित्र दिसत असली तरी जेव्हा बिकट परिस्थिती उदभवते तेव्हा ही यंत्रणा आपले काम प्रभावी पण करत असते. भेटू उद्या, हिंदुस्थानी शेअर बाजारातील सर्किट फिल्टर कधी आणि कसे लागले होते याविषयीची माहिती घेऊन.

आपली प्रतिक्रिया द्या