पैशांचा पाऊस भाग २१ – कंपनी निवडीची सप्तपदी

136
mumbai share market

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

शेअर बाजारातील गुंतवणुकीचे गुरु आणि जगातील श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफेट यांनी कोका-कोला, मॅक डोनाल्ड, जिलेट आणि वॉशिंग्टन पोस्ट या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून चांगलाच नफा कमावला. कोका कोलाचे अजूनही मोठ्या प्रमाणावर शेअर्स त्यांच्याकडे आहेत. या कंपन्यांचे ग्राहक व्हायचे की मालक हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा काही महत्वाच्या बाबी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

>>कंपनी निवडताना पुढील सप्तपदीचे सूत्र लक्षात ठेवा

१. कंपनीची मॅनजमेंट – कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी निवडताना त्या कंपनीची मॅनजमेंट कोण आहे. त्यांची विश्वासहर्ता काय? त्यांचा इतिहास काय? फक्त कंपनीचे प्रोडक्ट बघून कंपनी चांगली आहे असे समजू नका. किंगफिशर एरलाईन्स २००६ मध्ये पहिल्या क्रमांकाची एरलाईन्स कंपनी होती. आज कंपनीला टाळे आहे.

२. कंपनीची उत्पादने आणि सेवा – तुम्ही ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार आहात त्या कंपनीची उत्पादने किंवा त्याला असलेली मागणी भविष्यात वाढेल की कमी होईल हा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे. आज मला कोणी सांगितले की पेन ड्राईव्ह बनवणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक कराल का? नाही ना? कारण आता इंटरनेटवर क्लाऊड सुविधेमुळे तुम्हाला पेन ड्राईव्हची गरजचं भासत नाही.

३. कंपनीवर असलेले निर्बंध – काही कंपन्या अशा असतात ज्यावर सरकारचे कठोर निर्बंध असतात. त्यामुळे चांगले प्रॉडक्ट, चांगली मॅनेजमेंट असूनसुद्धा कंपन्यांना नफा कमावता येत नाही. BPCL, ONGC आणि HPCL या तिन्ही पेट्रोलियम संबंधित कंपन्या गेले १० वर्ष नुकसानीत होत्या, कारण पेट्रोल-डिझेलचे दर सरकार ठरवत असे. आताही सरकार ठरवते पण ते आता दार १५ दिवसाला खनिज तेलाच्या जागतिक दरानुसार ठरते. गेल्या २ वर्षातील या कंपन्यांची ग्रोथ बघा म्हणजे मला काय बोलायचे आहे हे तुमच्या लक्षात येईल.

४. कंपनीची ग्रोथ – आपण ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू इच्छितो त्या कंपनीची ग्रोथ त्याच्या क्षेत्रातील ग्रोथ एवढी किंवा जास्त असेल तरच त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा. आज एरलाईन्स व्यवसायातील जवळपास सर्व कंपन्या एकमेकांमध्ये लागलेल्या स्पर्धेमुळे नुकसानीत आहेत पण अशा वेळेला सुद्धा इंडिगो एरलाईन्सची ग्रोथ चांगली आहे.

५. कंपनीच्या शेअर्सची किंमत – कंपनी सर्व बाजूनी चांगली आहे आणि आपल्याला त्यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्याआधी त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत बघणे गरजेचे आहे आणि ती किंमत योग्य आहे की नाही ते ही बघता आले पाहिजे. जसे आपण स्मार्टफोन घेताना अॅपल चा iPhone आपल्याला घ्यावासा वाटतो पण त्याची किंमत ऐकल्यावर आपण अँड्रॉइडचा स्मार्टफोन घेतो, हो ना?

६. कंपनीची आर्थिक बाजू – खूप वेळा चकाचक दिसणाऱ्या कंपनीची आर्थिक बाजू कमकुवत असू शकते. कमकुवत कंपनीच्या भविष्याबद्दल खूप प्रश्न उभे राहतात. त्यामुळे कंपनीची आर्थिक बाजू नीट समजून घ्या. पुढे आपण आर्थिक बाबींचे निकष पाहणारच आहोत.

७. स्वतःचा अभ्यास :- तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करता तेव्हा तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्या कंपनीचे मालक होता बरोबर ना? जर मग तुम्ही मालक आहेत म्हणजे आपल्या व्यवसायात काय चालू आहे हे बघणे आले. इथे आपण त्याला अभ्यास बोलू आणि तो तुम्हालाच करावा लागेल.

• कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन मागील ताळेबंद, पुढे येणाऱ्या योजना, नवीन प्रोडक्ट याची माहिती घेणे
• कंपनीच्या ग्राहकांकडून माहिती घेणे (माझ्याकडे मारुती सुझुकीचे शेअर्स आहेत त्यामुळे मारुतीची गाडी वापरणारा एखादा परिचित भेटला तर मी त्यांना कंपनीबद्दल अनेक प्रश्न विचारतो )
• कंपनीच्या वितरकाकडून माहिती घेणे (अनेकदा कंपनीचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात त्यामुळे वितरक योग्य माहिती आपल्याला देऊ शकतात)
• कंपनीचा त्या व्यवसायातील अनुभव. अशा एक ना अनेक गोष्टी.

अशा प्रकारे एखाद्या कंपनीच्या ग्राहकापासून सुरु झालेला प्रवास मालकापर्यंत पोहचला आहे. कंपनी निवडी संदर्भात अजून खूप काही शिकायचे आहे. चला तर मग आपण ज्या कंपनीचे ग्राहक आहात त्याची लिस्ट बनवायला घ्या आणि वरील बाबींवर तुमच्या कंपनी चेक करायला घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या