पैशांचा पाऊस भाग ९ – बोनस शेअर्स म्हणजे काय?

303

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)mahesh-chavan-th

फ्री एसएमएसचे गौडबंगाल पाहिल्यानंतर फ्री या शब्दावरचा तुमचा विश्वासच उडाला असेल आणि त्याच बरोबर शेअर बाजारामध्ये असे काही तरी भयानक घडत असेल तर शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीच्या निर्णयावर तुम्हाला शंका येत असेल, हो ना?….. तर काळजी नसावी. कारण आज जो विषय आपण समजून घेणार आहोत तो म्हणजे खरा संपत्ती निर्माण करायचा मार्ग आहे आणि यामध्ये होणारी जी वाढ आहे त्याला अवाढव्य वाढ म्हणजे मोजता न येणारी वाढ संबोधले जाते.

खूप जणांनी एकले असेल की विप्रो या कंपनीमध्ये १९८० साली केलेल्या रु. १०००० गुंतवणुकीचे आज जवळपास ६०० कोटी झाले आहेत, हो ६०० कोटी. आकडा चुकला नाही, तो बरोबरच आहे. म्हणूनच तुम्हाला बोललो ना संपत्ती निर्माण करायचा हा मार्ग आहे तर जाणून घेऊया १९८० साली घेतलेल्या १०००० हजाराच्या गुंतवणुकीचे १०० शेअर्सची आज किंमत ६०० कोटी आणि शेअर्सची संख्या जवळपास १ कोटी कशी झाली ते पाहूया.

खूप वेळा आपण शेअर्स बाजारात गुंतवणूक करत नसतानाही शेअर्स बाजारातील बातम्या आज आपल्याकडे पोहचतात. एखाद्या कंपनीने बोनस शेअर्स जाहीर केले ऐकल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते आणि काही माहिती नसताना त्यांना बोनस शेअर्सबद्दल कुतुहूल जागे होते.आज आपण या बोनस शेअर्स ची संकल्पना समजून घेऊया.

बोनस शेअर्स म्हणजे काय ?

बोनस शेअर्स कंपनीच्या सध्याच्या शेअर होल्डर्सना दिले जातात आणि यासाठी कंपनी आपल्या फ्री रिजर्व फंडचा उपयोग करते. समजा एखाद्या कंपनी कडे ५०० करोड चे भाग भांडवल आहे आणि फ्री रिजर्व फंड १००० करोड आहे. आता जर कंपनी ने १:१ रेशो ने बोनस शेअर्स दिले तर भाग भांडवल १००० करोड होईल. फ्री रिजर्व मध्ये ५०० करोड होतील.

बोनस शेअर्स का दिले जातात ?
बोनस शेअर्समुळे शेअर्सच्या खरेदी विक्रीमध्ये वाढ होते, त्याच बरोबर तरलता वाढते. शेअर्सची मार्केट मधील संख्या वाढल्यामुळे नवीन गुंतणूकदार आकर्षित होतात. बनास शेअर्स दिल्यानंतर शेअर्सची किंमत कमी होते. शेअर्सची कमी होणारी किंमत बोनस शेअर्सच्या रेशोच्या प्रमाणानुसार होते. म्हणजे १: १ या रेशोनुसार पहिले तर आधी जर शेअर्सची किंमत १०० असेल तर बोनसनंतर ५० होईल.

बोनस शेअर्स नंतर कंपनीच्या फंडामेंटल्स वर काय बदल होतो ?

बोनस शेअर्स मुले फंडामेंटल्स वर फारसा बदल होत नाही. कंपनी ची एकूण मालमत्ता तितकीच राहते
बोनस शेअर्स आधी :- भाग भांडवल ५०० करोड + रिजर्व १००० करोड = १५०० करोड
बोनस शेअर्स नंतर :- भाग भांडवल १००० करोड + रिजर्व ५०० करोड = १५०० करोड

बोनस शेअर्स दिल्यामुळे शेअर्स होल्डरमध्ये एक उत्साहाचे वातावरण तयार होते. दीर्घकालीन गुंतवणूकदारणासाठी बोनस शेअर्स म्हणजे नोकर दाराला दिवाळीमध्ये मिळणाऱ्या बोनस प्रमाणे असते. वरील विप्रोच्या उदाहरणाप्रमाणे भारतीय शेअर्स बाजारमध्ये बोनस देणाऱ्या खूप कंपन्या आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांचे हजाराचे करोडोमध्ये रूपांतर केले आहे. त्यातील काही शेअर्सची यादी पाहू
१. एशियन पेन्ट्स
२. मारुती सुजूकी
३. सिप्ला
४. इन्फोसिस
५. कोलगेट
६. लार्सन अँड टुब्रो

बोनस शेअर्स हे संपत्ती निर्माण करण्याचे साधन आहे. याचा अभ्यास करा. पुढील सदरात आपण स्प्लिट ऑफ शेअर्स पाहू.

आपली प्रतिक्रिया द्या