पैशांचा पाऊस भाग-३ : शेअर बाजारातील अगम्य गोष्टींची तोंडओळख

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)mahesh-chavan-th

पहिल्या दोन भागांमध्ये आपण शेअर्स, शेअर बाजार, अंधश्रद्धा, फायदे तोटे आणि डीमॅट अकाऊंटबद्दल थोडी माहिती जाणून घेतली. तिसऱ्या भागामध्ये आपण शेअर मार्केटबाबत थोडी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण या माहितीच्या आधारे आपल्याला अभ्यासाला सुरुवात करता येते.

((दर सोमवारी महेश चव्हाण यांचा गुंतवणुकीसंदर्भात ब्लॉग असेल, तर शुक्रवारी ५ वाजता पुढल्या आठवड्यातील शेअर्सच्या चढ उताराचे अंदाज वर्तवणारी माहिती प्रसिद्ध करण्यात येईल))

वृत्तपत्रांमध्ये, टीव्ही चॅनेल्सवर NSE आणि BSE हे दोन शब्द सातत्याने कानावर आदळत असतात, मात्र याबाबत अनेकांना माहिती नसतं. NSE आणि BSE ही हिंदुस्थानातील प्रमुख स्टॉक मार्केट आहेत, या स्टॉक मार्केट ही ती जागा आहे, जिथे शेअर्सची खरेदी विक्री केली जाते. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याची स्थापना १८७५ साली झाली. BSE हा भारतातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि याची स्थापना १९९२ साली झाली. आज BSE ला ८७४ नोंदणीकृत ब्रोकर आहेत तर NSE कडे ११०० नोंदणीकृत ब्रोकर आहेत. लोकांचा असा समज आहे की देशात ही फक्त दोनच स्टॉक एक्स्चेंज आहेत, मात्र हा समज चुकीचा असून देशात अशी एकूण अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज,कोलकत्ता स्टॉक एक्सचेंज अशी एकूण १७ स्टॉक एक्स्चेंज आहेत.

सेन्सेक्स म्हणजे काय ?
SENSEX हा शब्द Sensitive Index या शब्दापासून तयार झाला आहे (Sens+ex= SENSEX) याला मराठीमध्ये संवेदनशील सूचकांक असे म्हणतात. सेन्सेक्स हा बीएसईचा निर्देशांक आहे, सेन्सेक्समध्ये देशातील ३० कंपन्या निवडल्या जातात या कंपनीच्या समभागांच्या चढउतारावर सेन्सेक्स वर जातोय का घसरतोय हे बघितलं जातं.

निफ्टी म्हणजे काय ?
निफ्टी हा शब्द एन.एस.ईचा निर्देशांक आहे. एन.एस.ईमध्ये ५० कंपन्यांचा सहभाग असतो त्यामुळे NSE + FIfty म्हणजेच निफ्टी असा त्याचा अर्थ होतो. हे दोन्हीही सूचकांक त्यात समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या दर ३ सेकंदाच्या हालचालीवरुन ठरविले जातात.

एनएसडीएल आणि सीडीएसएल म्हणजे काय ?
साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जसे एखादा धान्याचा व्यापारी त्याच्याकडे असलेल्या मालाचा साठा त्याच्या गोडाऊनमध्ये ठेवतो तसाच आपण विकत घेतलेले शेअर एका ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठीही गोडाऊन तयार केलेलं आहे ती जागा म्हणजे एनएसडीएल आणि सीडीएसएल.

NSDL( नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी सर्व्हीसेस) CSDL ( सेंट्रल सिक्युरिटीज डिपॉजिटरी सर्व्हीसेस)

शेअर्स कागदी स्वरूपात ठेवणे चांगले की डिमॅट स्वरुपात ?
काळानुसार गोष्टींमध्ये बदल घडत असतात. लँडलाईन गेले आणि मोबाईल फोन आले, सायकली गेल्या आणि बाईक आल्या ,चारचाकी आल्या तसंच कागदी स्वरुपातील शेअर्सचा जमाना आता गेला आहे. हल्ली डिमॅट अकाऊंट ही शेअर बाजारात खरेदी विक्रीसाठी गरजेची गोष्ट बनली आहे. सध्या जवळपास सगळेच व्यवहार डीमॅट अकाऊंटद्वारे केले जातात, कालांतराने व्यवहाराचा फक्त हाच एक मार्ग उरणार आहे. डिमॅट स्वरूपातील शेअर्सचे व्यवहार करणं सोपं झालंय, कागदी स्वरुपातील शेअर्स गहाळ झाले, पाण्यात भिजून खराब झाले, चोरीला गेले तर गुंतवणूक बु़डण्याची शक्यता असते. असे शेअर विकत घेण्यासाठीही किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे डीमॅट अकाऊंद्वारे खरेदी विक्री हा सुटसुटीत, सोपा आणि जलद मार्ग आहे.

शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवहार कसा होतो ?
जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो तेव्हा तुम्ही खरेदी व्यवहाराचा दिवस सोडून कामकाजाच्या २ दिवसांनंतर तुमच्या खात्यात जमा होतात. सगळा व्यवहार हा ऑनलाईन असल्याने शेअर्स खरेदी करताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पैसे भरावे लागतात. या कामात तुम्ही वाकबगार असाल तर ठीक अन्यथा यासाठी ब्रोकरची मदत घेणं योग्य ठरेल. शेअर्सची विक्री केली असेल तर विकलेल्या शेअर्सचे पैसे व्यवहार झाल्याचा दिवस आणि कामकाजाचे दोन दिवस अशा तीन दिवसांनंतर आपल्या खात्यात जमा होतात.

शेअर्स खरेदी विक्री मध्ये बँक अकाउंट चे स्थान काय?

शेअर्स खरेदी विक्रीसाठी जेव्हा आपण डीमॅट अकाऊंट सुरु करतो तेव्हा तुमचं बँकेमध्ये खातं असणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही व्यवहार करू शरणार नाही. शेअर्सचे व्यवहार बँकेचं खातं आणि डीमॅटशी जोडून ऑनलाईन पद्धतीने किंवा चेकद्वारे केले जातात. रोख रकमेने कधीही शेअर बाजारात व्यवहार केले जात नाही.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. ई-मेल आयडी: mahesh@i4investments.in

टीप- शेअर बाजारात गुंतवणूक हा जोखमीचा विषय आहे. लेखातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाव्यतिरिक्त स्वत: खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करु नये, गुंतवणुकीत तोटा सहन करावा लागल्यास आम्ही जबाबदार नाही.