बाप्पापुढे रांगोळीतून साकारली पैठणी

335

माधुरी माहूरकर, संभाजीनगर

संभाजीनगरच्या अर्चना शिंदे यांनी बाप्पापुढे रांगोळीतून पैठणी साकारली आहे. गर्द निळी पैठणी बाप्पाच्या आराशीची शोभा अजूनच भरजरी करते. प्लॅस्टिक, थर्माकॉलची कृत्रिम आरास करण्यापेक्षा ही रेशमी रांगोळीची आरास खऱया अर्थाने पर्यावरणपूरक ठरते.

ठिपके जोडून तयार केलेली चित्ताकर्षक आणि सुंदर कलाकृती म्हणजे रांगोळी! धान्याची रांगोळी, नाण्यांची रांगोळी, पाने, फुलांची रांगोळी अशा विविध प्रकारच्या रांगोळ्यांमुळे महिलांच्या कलाविष्काराला दाद मिळू लागली. अशा सर्व प्रकारच्या रांगोळ्यांचे प्रयोग करीत करीत संभाजीनगरच्या अर्चना प्रदीप शिंदे यांनी फ्रिहॅन्ड रांगोळीत चांगलाच नावलौकिक मिळवला आहे.

मुद्रण आणि छपाईच्या क्षेत्रातील नामांकित प्रिन्टवेल या उद्योगाचे संचालक प्रदीप शिंदे यांच्या पत्नी अर्चना शिंदे यांना आपल्या आईवडिलांकडून कलेचा हा वारसा मिळाला. संभाजीनगरातील बन्सीलाल नगर येथे राहणारे सुधाकर घाटे हे गणेशोत्सवात विविध प्रकारचे देखावे तयार करण्याबाबत विशेष प्रसिद्ध होते. या सर्व देखाव्याची जडणघडण सुरू असे तेव्हा अर्चना व तिचे भावंड बारकाईने ते पहात, अर्चनाच्या आई मीना घाटे यांनाही कलेची आवड असल्याने मुलांमध्ये आपोआपच भिनली. त्यामुळे शालेय जीवनात अर्चना पेंटिंगकडे वळल्या. उत्कृष्ट कलाकृती साकारू लागल्या. दहा वर्षांपूर्वी विवाहानंतर जेव्हा अर्चना आपल्या पतीघरी आल्या तेव्हा तेथेही त्यांना कलासक्त वातावरण मिळाले.

पाच बोटांची, धान्याची, नाण्यांची, पाना, फुलांची, पाण्यावर तरंगणारी, पाण्याच्या तळाशी असलेली अशा विविध प्रकारच्या आकर्षक रांगोळ्या काढता काढता त्यांना कल्पना सुचली की ज्या प्रमाणे आपण चित्रकलेतील चित्रे काढतो, तशी फ्रिहॅन्ड रांगोळी काढली तर? मग देवघरापुढे, गणपतीपुढे, महालक्ष्मीपुढे फ्रिहॅन्ड रांगोळीचे प्रयोग सुरू झाले. इथे मात्र परीक्षा सुरू झाली. चित्रकलेसाठी पाहिजे तेवढे, पाहिजे त्या छटांचे रंग मिळतात, शिवाय त्यांचे पाहिजे तसे मिश्रण करून नव्या छटा निर्माण करता येतात. पण रांगोळीत अडचण अशी की, मोजकेच रंग उपलब्ध असतात. त्यामुळे पाहिजे ती रंगसंगती तयार करणे हे महाजोखिमीचे काम!

दगडातून मूर्ती तयार करणारा कलावंत दगडावर छन्नी हातोडय़ाचे घाव अतिशय जपून, विचारपूर्वक आणि किती जोर देऊन आघात करायचा हे ठरवूनच घालत असतो. कारण घाव घातला की पुन्हा माघार नाहीच. रांगोळीतही तसेच आहे, एकतर मर्यादित शेडमध्ये उपलब्ध असलेल्यापैकी अतिशय विचारपूर्वक रांगोळीचा रंग निवडायचा, अतिशय एकाग्रतेने रांगोळीत तो शेड पेरायचा ही सारी कसरतच. पण ज्या गोष्टीत आवड असते ती कितीही कठीण असली तरी करण्यात माणूस आपोआप एकग्र तर होतो. त्याचा आनंदही वर्णनातीतच असतो.

अर्चना शिंदे म्हणतात, फ्रिहॅन्ड रांगोळी काढताना त्यातील परफेक्शन कोणत्याही परिस्थितीत कायम राखायचे असे ठरवूनच रांगोळीला सुरुवात करते. कारण मूर्तीप्रमाणेच रांगोळीचेही असते. एकदा का रांगोळीचा रंग भरणे सुरू केले त्यात काही चूक झाली की ना ती रांगोळी पुन्हा उचलता येत ना ती पुसता येत! रांगोळी काढताना एवढे एकाग्र असावे लागते की कोणत्याही परिस्थितीत चुकायचे नाहीच! एवढेच आपल्या हाती असते. त्यामुळे सुरुवातीला मी लहान आकाराच्या रांगोळ्यांच्या चित्रकृती काढू लागले. जसजसा हात बसू लागला किंबहुना आत्मविश्वास वाढत गेला तसा रांगोळीचा आकार वाढत मोठा होत गेला.

गेल्या वर्षी महालक्ष्मींपुढे रांगोळीतून कश्मिरी गालिचा चितारला त्याला तब्बल १६ तास लागले. यंदा पैठणी काढली त्याला किमान १२ तास लागले.

अर्चना शिंदे यांच्या रांगोळी कलेतील ही प्रगती थक्क करणारी आहे. कोणत्याही प्रकारची रांगोळी त्या ज्या सहजतेने काढतात त्यांच्या बोटातील ती जादूही आश्चर्यचकित करणारी आहे. एकदा रांगोळी काढायला सुरुवात केली की ती जशी जशी पूर्ण होऊ लागते तशी तशी पुढची सुचत जाते आणि एकाच प्रयत्नात संपूर्ण रांगोळी तयार होते. त्याकरता मग कधी १२ तास तर कधी १६ तासांच्या बैठकीची तयारी असावी लागते एवढेच!

 

आपली प्रतिक्रिया द्या