पैठणीला नोटबंदीचा फटका

येवला, (सा.वा.)

नोटाबंदीचा परिणाम सर्वत्र मोठ्या प्रमाणावर जाणवत असताना सातासमुद्रापार प्रसिद्ध असलेल्या सोन्यासारख्या पैठणी व्यवसायालाही नोटाबंदीचा फटका बसला आहे. ऐन लग्नसराईच्या कालावधीतही पैठणी उद्योगावर मंदीचे सावट आले असून सुमारे ७० टक्क्यांनी पैठणी विक्रीत घट झाल्याचे दिसून आले आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य विणकरांनाही रोख पैसे मिळत नसल्याने उपासमारीची वेळ विणकरांच्या कुटुंबावर आली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पैठणी खरेदीसाठी संपूर्ण देशभरातून शहरात येणारा ग्राहक वर्ग कमी झाल्याने पैठणी विक्रीवर निर्बंध आल्यासारखेच चित्र बघावयास मिळत आहे.

पैठणीचे शहर म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या येवल्यात सुमारे ३ हजार ५०० पैठणी उत्पादनाचे हातमाग असून ८ ते १० हजार विणकर आहेत. सुमारे १ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह पैठणी व्यवसायावर अवलंबून आहे. यात रेशीमसारख्या कच्च्या मालाची विक्री करणारे व्यापारी, रंग काम करणारे रंगारी, रेशीम भरणारे मजूर, विणकर, छोटे-मोठे व्यापारी यांचा समावेश आहे. सध्या तरी पैठणी विक्रीचा व्यवसाय हा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व धनादेश आदींवरच सुरू असून सर्वसामान्य ग्राहकांकडे नवीन चलन नसल्याने पैठणी विक्रीचे शहरातील अद्यावत शोरूमही ओस पडलेले दिसून येत आहेत. शहरात पैठणीसाठी लागणारा रेशीमचा कच्चा माल विक्री करणारे सुमारे १५ व्यापारी आहेत. या व्यापार्‍यांकडून रेशीम खरेदीसाठी विणकरांकडे रोख पैशांची मागणी केली जात आहे. दुसरीकडे पैठणी खरेदी करणारे व्यापारी विणकरांना पैठण्यांची रक्कम धनादेशाद्वारे देत आहे. सदरचे धनादेश विणकरांना बँकेत खात्यावर जमा करावे लागत असल्याने व त्यातच बँकांकडून रोख रक्कम मोठ्या प्रमाणावर मिळत नसल्याने कच्च्या मालाची खरेदी कशी करावी, हाही यक्ष प्रश्‍न विणकरांसमोर उभा राहिला आहे.

व्यापार्‍यांचीही पाठ

शहरात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, जळगाव, संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरातून नोटाबंदीपूर्वी दररोज ८ ते १० व्यापारी पैठणी खरेदीसाठी शहरात येत असत. मात्र गेल्या महिनाभरापासून दररोज एकही व्यापारी शहरात पैठणी खरेदीसाठी आलेला नाही. ऐन लग्नसराईतही नोटाबंदीमुळे संक्रांतीपूर्वीच पैठणी व्यवसायावर ‘संक्रात’ आली आहे.

४० लाखांचा फटका

पैठण्या येवले शहरात मिळत असल्याने पूर्वी संपूर्ण शहरात सुमारे ४०० ते ५०० पैठण्यांची विक्री होत असे. आज हीच विक्री दिवसाला सुमारे २०० पैठण्यांवर आली आहे. यामुळे शहरातील पैठणी व्यवसायाला सुमारे ३० ते ४० लाखांचा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र समारे आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या