लेख : पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानी अत्याचार

693

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

पाकिस्तानव्याप्त कश्मीरमध्येही पाकिस्तानविरोधात सूर उमटत आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांची गळचेपी करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि सैनिकांकडून अत्याचार केले जात आहेत. अलीकडेच पाकिस्तानव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानपासून मुक्ती मिळवण्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. हे आंदोलन जेकेएलएफचे अध्यक्ष मोहम्मद सगीर याच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते.

पाकिस्तानी लष्कराविरुद्ध मानसिक युद्ध
पाकिस्तानी लोक त्यांच्या लष्कराला जगातील श्रेष्ठ लष्कर मानतात. आण्विक अस्त्रs, क्षेपणास्त्रs आणि आठ लाख कडवे जवान यांच्या भरवशावर आपण हिंदुस्थानला कधीही नमवू शकतो असा एक विश्वास त्यांच्या मनात निर्माण करण्यात आला आहे. हिंदुस्थानसोबतची चार युद्धे पाकिस्तान हरला. कारण राजकीय नेतृत्वाने कच खाल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कराला माघार घ्यावी लागली असेच पाकिस्तानी जनतेत ठसविण्यात आले आहे. कलम 370 निष्प्रभ करून कश्मीर राज्याचा दर्जा एका केंद्रशासित प्रदेशाचा केल्यानंतर आपले लष्कर तत्काळ काहीतरी कारवाई करून हिंदुस्थानला नमते घेण्यास भाग पाडेल याची प्रत्येक पाकिस्तानीला खात्री होती, परंतु तसे काहीही झाले नाही. तरीही पाकिस्तानी आपल्या लष्कराला दोष देत नाहीत. त्यांचा सर्व राग आता इम्रान खान आणि त्यांच्या सरकारवर निघत आहे. याचा आपण फायदा उठवून पाकिस्तानी लष्कराविरुद्ध मानसिक युद्ध सुरू करून त्यांचे खच्चीकरण केले पाहिजे.

गेल्या 72 वर्षांत पाकिस्तानला हिंदुस्थानी सैन्याने अनेक वेळा कोंडीत
पकडले. 1947 मध्ये हिंदुस्थानी सैन्य पाकव्याप्त कश्मीरची राजधानी मुझफ्फराबादपर्यंत पोहोचले होते. 1965 च्या युद्धात आपण हाजीपीर खिंड ताब्यात घेतली होती. 1971 च्या बांगलादेश युद्धात पकडलेले 94 हजार पाक सैनिक आपल्या ताब्यात होते, परंतु तरीही 1947 साली गमावलेला एक तृतीयांश कश्मीर (ज्याला पाकव्याप्त कश्मीर म्हणून ओळखले जाते) परत मिळवण्यातही आपले राज्यकर्ते अपयशी ठरले. कश्मीरमधील फुटीरता व तिथे फोफावलेला दहशतवाद यांचे मूळ हे मुख्यतः ‘पाकव्याप्त कश्मीर’ आहे. कश्मीरमधल्या पाकधार्जिण्या, फुटीरतावादी लोकांचे व दहशतवाद्यांचे स्वतंत्र इस्लामी कश्मीरचे स्वप्न जिवंत राहिले. हिंदुस्थानकडून कधी ना कधी पाक पूर्ण कश्मीर हिसकावून घेईल अशी आशा ते बाळगून होते.

ज्या भागाला आपण पाकव्याप्त कश्मीर असे म्हणतो त्याला पाकिस्तान ‘आझाद कश्मीर’ म्हणतो. युनायटेड नेशन्स आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना पाकव्याप्त कश्मीरचा उल्लेख Pakistan administered Kashmir म्हणजेच पाकिस्तान प्रशासित कश्मीर असा करतात. पाकव्याप्त कश्मीरच्या सीमा चीन आणि अफगाणिस्तान या देशांना लागून आहेत. फाळणीनंतर पाकिस्तानच्या पठाण आदिवासींनी जम्मू व कश्मीरवर हल्ला केला व काही भाग ताब्यात घेतला. या भागाची लोकसंख्या 46 लाख व राजधानी मुझफ्फराबाद आहे. पाकव्याप्त कश्मीरचा उत्तरेकडील भाग, जो चीनच्या ताब्यातला भूभाग म्हणून नकाशावर दाखवला जातो, तो 1963 मध्ये झालेल्या Sino-Pakistan कराराचा परिणाम आहे. पाकिस्तानने हा भूभाग चीनला भेट म्हणून दिलेला आहे. तेव्हापासून या भागाला नकाशात ‘1963 मध्ये पाकिस्तानद्वारे चीनकडे सोपवण्यात आलेला भाग’ असे दाखवले जाते.

बहुतेक दहशतवादी संघटनांचे (‘लश्कर-ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद वगैरे) ट्रेनिंग कॅम्प पाकव्याप्त कश्मीरमध्ये आहेत. पाकव्याप्त कश्मीरमध्ये कुठलीही माध्यमे स्वतंत्र नाहीत. ती सर्व पाकिस्तान सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरेंना थारा नाही व फक्त ‘आझाद कश्मीर’ रेडिओचेच प्रसारण करण्यास परवानगी आहे. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे व अर्थव्यवस्था नगण्य आहे.

हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांकडे नेऊन फार मोठी चूक केली. जर हिंदुस्थानने त्याच वेळी कठोर भूमिका घेऊन त्यावर उपाय केला असता तर हा प्रश्न इतकी वर्षे प्रलंबित राहिला नसता. पाकव्याप्त कश्मीरवर ताबा मिळवूनसुद्धा पाकिस्तानची हाव संपली नाही. त्यांना संपूर्ण कश्मीरचा ताबा हवा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करीतच राहतील.

हिंदुस्थानने कलम 370 निष्प्रभावी करण्याचा आणि जम्मू-कश्मीरचे विभाजन करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तान पाकव्याप्त कश्मीर वाचवण्याची धडपड करू लागला. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान इम्रान खान यांनी 15 सप्टेंबरला पाकव्याप्त कश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे एका रॅलीचे आयोजन केले व हिंदुस्थानविरोधात गरळ ओकले, परंतु त्यावेळी स्थानिकांना हिंदुस्थानविरोधात भडकावण्याचा त्यांचा उद्योग सुरू असतानाच तिथे उपस्थित लोकांनी इम्रान खान यांच्याविरोधातच ‘गो नियाझी गो बॅक’च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. इम्रान खान यांच्या विरोधातील घोषणाबाजीची ही ध्वनिचित्रफीत पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ झकारिया यांनी ट्विट केली आहे. पाकिस्तानव्याप्त कश्मीरमध्येही पाकिस्तानविरोधात सूर उमटत आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांची गळचेपी करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि सैनिकांकडून अत्याचार केले जात आहेत. अलीकडेच पाकिस्तानव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानपासून मुक्ती मिळवण्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. हे आंदोलन जेकेएलएफचे अध्यक्ष मोहम्मद सगीर याच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते.

कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्ध जो अपप्रचार सुरू केला आहे, तो अंगलट येऊ शकतो या भीतीने पाकिस्तानव्याप्त कश्मीरमधील आंदोलन दडपण्यासाठी पाकिस्तान क्लृप्त्या लढवत आहे. इस्लाम धर्माचा संदर्भ देऊन भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सैनिक आणि पोलिसांकडून अत्याचार सुरू आहेत. सुमारे 40 जणांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. एवढेच नाही तर आंदोलकांच्या नातेवाईकांचाही छळ सुरू आहे. पाकिस्तानात नेहमीच हुकूमशाही राज्य करते. पाकव्याप्त कश्मीरमधील जनता ही पाकिस्तानची गुलाम म्हणून जीवन जगत आली आहे. भेदभावाचे बळी पडलेल्या या नागरिकांच्या स्रोतांचा उपयोग हा पाकिस्तानच्या फायद्यासाठीच केला गेला आहे. त्याचा लाभ स्थानिकांना कधीही मिळाला नाही. नैसर्गिक संपदा भरपूर असूनही त्याचा वापर केवळ दहशतवादी छावण्यांसाठीच केला जातो. या छावण्यांमुळेच तेथे शिक्षण आणि विकासाला चालना मिळत नाही. दहशतवाद्यांना केवळ इस्लामवर आधारित व्यवस्था हवी आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरही अत्याचार केले जात आहेत. पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षातील एक माजी आमदार बलदेव कुमार यांनी हिंदुस्थानात आश्रय मागितला आहे. आता पाकव्याप्त कश्मीरवरूनही हिंदुस्थानला आक्रमक धोरण अवलंबावे लागेल. पाकव्याप्त कश्मीरमधील पाकिस्तानचे कारनामे जेव्हा कळतील तेव्हा पाकिस्तान दहशतवाद कसा पोसतो याचा चेहरा जगासमोर येईल. ती काळाची गरज आहे. पाकव्याप्त कश्मीरच्या जनतेला नैतिक मदत देऊन त्यांच्यावरील अत्याचारांकडे जगाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या