पंतप्रधान इम्रान खान खुर्ची वाचवण्यात यशस्वी, विरोधकांचा बहिष्कार पथ्यावर पडला

पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात झालेल्या जोरदार हाणामारीमुळे सर्वच विरोधी नेत्यांनी पंतप्रधानांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानावर बहिष्कार टाकला. हा बहिष्कार खुर्ची गमावण्याची वेळ आलेले पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पथ्यावरच पडला. विरोधकांच्या अनुपस्थितीत इम्रान यांनी 178 मते मिळवत आपले बहुमत सिद्ध केले. त्यामुळे आता इम्रान यांच्या तेहेरीक ए इन्साफ पक्षाचे सरकार तरले आहे. बहुमतासाठी इम्रान यांना 172 मतांची गरज होती, पण त्याहीपेक्षा अधिक  मते त्यांना मिळाली.

पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावरील मतदानाआधी पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेम्बलीबाहेर सत्ताधारी तेहेरीक ए इन्साफ पक्षाचे कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांत जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी खासदारांनी विरोधी नेत्यांवर चपलांचा मारा करीत अनेकांना लाथांचा प्रसाद दिला. पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ ) पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ यांनाही इम्रान खान समर्थकांनी केलेल्या हाणामारीत लाथा-बुक्क्यांचा प्रसाद मिळाला. त्यामुळे पाकिस्तानी राष्ट्रीय असेम्ब्लीबाहेर झालेल्या हाणामारीनंतर असेम्ब्लीच्या  सिनेट चेअरमननी विरोधी सदस्यांना सभागृहात येण्यासाठी 5 मिनिटांचा अवधी दिला, पण विरोधकांनी या चाचणीवरच बहिष्कार टाकत सभागृहात येणे टाळले. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान करण्यासाठी फक्त सत्ताधारी पीटीआय पक्षाचे खासदार उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या